गुरूपौर्णिमेचा दिवस अवघ्या दोन दिवसांवर आला असून या पार्श्वभूमीवर शिर्डीत जोरदार तयारी सुरू आहे. वर्षभर गुरूंनी दिलेल्या ऋणातून उतराई होण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने शिर्डीतही भाविकांची गर्दी होत आहे. येत्या तीन जुलै रोजी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साई बाबा मंदिर भक्तांसाठी रात्रभर खुले राहणार असल्याने यंदाही भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता आहे.
शिर्डीच्या साई मंदिरात दरवर्षी तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार असून दोन ते चार जुलै दरम्यान हा उत्सव साजरा केला जाणार असून साई संस्थानकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन जुलै रोजी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने भाविकांना दर्शनासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी साई समाधी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. चार जुलै रोजी पहाटेची काकड आरती होणार नाही. साईबाबा हयात असल्यापासून गुरुपौर्णिमा उत्सव शिर्डीत साजरा केला जातो. या तीन दिवसीय उत्सवानिमित्त साईबाबांना गुरुस्थानी मानून लाखो साईभक्त शिर्डीत दर्शनासाठी येत असतात, तर अनेक पायी पालख्यासुद्धा शिर्डीत येण्यास सुरुवात झाली आहे.
देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांना भाविक गुरूस्वरूपी मानतात. भारतीय संस्कृतीत गुरूला देवापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. हीच भावना ठेवून लाखो भाविक साई दर्शनासाठी शिर्डीत दाखल होत आहेत.
नाशिक, पुणे, मुंबई आदी ठिकाणाबरोबरच परराज्यातील अनेक पालख्या साईबाबांच्या नामाचा जयघोष करत शिर्डीत दाखल होत आहेत. या व्यतिरिक्त अनेक भाविक रात्रभर पायी प्रवास करत शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डीत दाखल होणाऱ्या साईभक्तांना मनसोक्त दर्शन घेता यावे, यासाठी साई समाधी मंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार आहे.
गुरूपौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच तीन जुलै रोजी सकाळी काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि वीणा यांची सवाद्य मिरवणूक गुरुस्थान मार्गे द्वारकामाईत नेण्यात येणार आहे. गुरूला भगवंत मानून गुरूंनी आपल्यावर केलेल्या उपकरातून उतराई होण्याचा गुरूपौर्णिमेचा दिवस असतो.