Bhandardara Dam water Storage : अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण किती भरले ? वाचा आजचा पाणीसाठा

Ahmednagarlive24 office
Published:
Bhandardara Dam water Storage
Bhandardara Dam water Storage

Bhandardara Dam water Storage : गेल्या तीन ते चार दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे आदिवासी बांधवांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून पर्यटकांना भंडारदऱ्याचा पावसाळा म्हणजे आनंद द्विगुणीत करणारा ठरला आहे.

शनिवार व रविवार असे सुट्टीचे औचित्य साधत अनेकपर्यटकांनी भंडारदऱ्याला भेट देत निसर्ग पर्यटन उपभोगले. भंडारदरा परिसरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील धबधबे खुलेआम कोसळत आहेत. नेकलेस फॉल, नान्ही फॉल, वसुंधरा धबधबा, बाहुबी धबधबा, साम्रदचा कोकणकड्यावरील रिव्हस धबधबा, तर पांजरे येथील पांजरा फॉल पाहण्यासाठी पर्यटकांनी एकच गर्दी केलेली दिसुन आली.

भंडारदरा परिसरात पावसाळा म्हणजे पर्यटकांची होणारी मोठी गर्दी; परंतु या गर्दीला नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिस बंदोबस्त असणे गरजेचे असल्याने अहमदनगर पोलिसांकडुन एक विशेष पथक नेमण्याची गरज आहे. त्याची तातडीने नेमणुक करण्याची मागणी परिसरातुन होत आहे. मागील २४ तासात भंडारदरा येथे ९९ मीमी पावसाची नोंद झाली.

रतनवाडी १३० मीमी, घाटघर १५० मीमी, पांजरे १२३ मीमी तर बाकी येथे ६६ मीमी पावसाची नोंद झाली आहे, तर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ५२.७८ % झाला आहे. भंडारदरा धरणात आत्ताच्या परिस्थितीत ५८२६ दशलक्ष घनफूट पाणी जमा असून सकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणात १८५ दशलक्ष घनफूट नविन पाण्याची आवक झाली होती.

वीजनिर्माण केंद्रातून ८३७ क्युसेकने पाणी प्रवरा नदीत वाहत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात कोसळत असलेल्या पावसामुळे भंडारदरा धरण निम्मे भरले असून ओढ्या नाल्यामधून वाहणारे पाणी भंडारदरा धरणाला मोठ्या प्रमाणात येऊन मिळत असल्याने धरणामध्ये नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe