Tomato Price : एप्रिल-मे महिन्यात एक रुपया किलोपर्यंत दर घसरून शेतकऱ्यांना रडविणाऱ्या टोमॅटोला आता विक्रमी दर मिळू लागला आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोने प्रति किलोला शंभरीचा दर पार केला आहे. पुढील काही दिवस टोमॅटोच्या दरात तेजीच राहणार असल्याचा अंदाज स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे भावात प्रचंड वाढ झाली आहे. नगर बाजार समितीत फक्त ९० क्विंटल टोमॅटोची आवक झाली त्याला ६ हजार ५०० रुपयांपर्यंत प्रति क्विंटलपर्यंत दर मिळाला.

किरकोळ बाजारात हाच दर प्रति किलो शंभर रुपयांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. गत महिन्यात टोमॅटोची आवक होती. मात्र, शेतकऱ्यांनी सुरुवातीला केलेल्या लागवडीचा टोमॅटो आता संपला आहे.
त्यातच यंदा पाऊस नसल्यामुळे दुसऱ्या टप्प्यात टोमॅटोची लागवड झाली नाही. पाणीटंचाई, वीजटंचाई, रोगांचा प्रादुर्भाव व मध्यंतरी कोसळलेले भाव त्यामुळे शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे टोमॅटोची आवक मंदावली आहे. त्यातच पाऊस नसल्यामुळे टोमॅटोचे उत्पादन घटले आहे.
परदेशातही मागणी वाढली
दिल्ली, कोलकाता, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात आदी ठिकाणांहून टोमॅटोला चांगली मागणी आहे. शिवाय काही प्रमाणात पाकिस्तान, बांगलादेश, दुबई येथील बाजारपेठेतही टोमॅटो पाठविला जात असल्याने भाव तेजीत आहे.
का वाढले टोमॅटोचे दर ?
हिवाळ्यात लागवड केलेला टोमॅटो आता संपला आहे. त्यातच उन्हाळ्यात टोमॅटोला प्रति किलो १ रुपया भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले. यामुळे अनेक शेतकन्यांनी टोमॅटो लागवडीकडे पाठ फिरविली. परिणामी बाजारात टोमॅटोची आवक घटली आणि भावात तेजी आली.
■ टोमॅटोने उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान केले. यामुळे पुन्हा टोमॅटोची लागवड करण्याचे शेतकऱ्यांचे धाडस होईना. त्यातच पाणी, वीज यांची मोठी टंचाई असल्याने टोमॅटो लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली.
■सध्या पावसाळा सुरु आहे मात्र पावसाचा पत्ता नाही, त्यातच शेतकयांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे बाजारात टोमॅटो विक्रीसाठी येण्याचे प्रमाण खूपच घटले आहे. भाव शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत.