Mumbai Metro News : मुंबईतील ६ मेट्रो मार्गिकांच्या ३६०३ मेट्रो खांबाची उभारणी झाली पूर्ण

Published on -

Mumbai Metro News : मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या विविध ६ मेट्रो मार्गिकांच्या कामकाजादरम्यान एकूण ४९२९ मेट्रो खांबापैकी ३६०३ मेट्रो खांबाची उभारणी करण्यात आली आहे.

पूर्व उपनगर, पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, मुंबई महानगर परिक्षेत्रातील अत्यंत रहदारी परिसरात मेट्रो मार्गिकांचे काम सुरू असून अशा आव्हानात्मक परिस्थितीतही मेट्रोचे काम अव्याहतपणे सुरू असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

मेट्रोच्या बांधकाम प्रक्रियेदरम्यान पिअर कॅप्स, यू-गर्डर आणि आय-गर्डर यांसारख्या अवजड प्रीकास्ट (पूर्वनिर्मित) घटकांच्या कास्टिंग आणि उभारणीवर मुख्य लक्ष केंद्रित केले जाते. हे प्रीकास्ट घटक वेगवेगळ्या कास्टिंग यार्ड्सवर तयार करून बांधकाम स्थानावर नेले जातात आणि ३५० ते ५०० मेट्रिक टन क्षमतेसह क्रेन वापरून उभारले जातात.

त्यामुळे महामार्गावरील तसेच सार्वजनिक वाहतुकीतील व्यत्यय कमी करून सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मेट्रोचे बहुतांश बांधकाम रात्रीच्या वेळी करण्यात येते. सार्वजनिक वाहतुकीवरील ताण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत आहे.

नुकतेच उद्घाटन झालेले मेट्रो मार्ग २अ आणि ७ हे मार्ग लाखो प्रवाशांना दिलासा देत आहेत. ज्यामुळे महामार्गावरील रहदारी आणि प्रदूषण कमी होण्यास हातभार लागला आहे. एमएमआरडीए सध्या गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) दरम्यान मेट्रो मार्ग १० साठी विविध परवानग्या मिळवण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याव्यतिरिक्त मेट्रो मार्ग १२ (कल्याण तळोजा ) साठी सामान्य सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे आणि स्थापत्य कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

एमएमआरडीएने हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पांचे उद्दिष्ट हे मुंबई शहर आणि त्याच्या उपनगरांमध्ये शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी प्रदान करणे आहे. वाहतूक कोंडी, नैसर्गिक आपत्ती,

तांत्रिक अडचणी आणि भूसंपादनाच्या समस्यांसारख्या आव्हानांना तोंड देत, मेट्रो नेटवर्क निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीए प्रयत्नशील आहे. मेट्रो प्रवासाला प्रवाशांची पसंती मिळत असल्याने महामार्गावरील रहदारी आणि प्रदूषण कमी होत आहे.

■मेट्रो मार्ग २ब (डी. एन. नगर ते मंडाले) : भौतिक प्रगती : ५०.७ टक्के पूर्ण झालेले खांब : ११०९ पैकी ६

■मेट्रो मार्ग ४(वडाळा ते कासारवडवली) : भौतिक प्रगती ५५ टक्के पूर्ण झालेले खांब : १४७६ पैकी ९७३

■मेट्रो मार्ग ४अ(कासारवडवली- गायमुख) : भौतिक प्रगती ५८.०८ टक्के पूर्ण झालेले खांब : २२१ पैकी १४३

■मेट्रो मार्ग ५ टप्पा १ ठाणे ते भिवंडी) : भौतिक प्रगती ७८.४ टक्के पूर्ण झालेले खांब : ४६४ पैकी ४४०

■मेट्रो मार्ग ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) : भौतिक प्रगती : ७०.७५ टक्के पूर्ण झालेले खांब : ७६९ पैकी ६५७

■मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मीरा भाईंदर) : भौतिक प्रगती : ६१.२८ टक्के पूर्ण झालेले खांब ९०० पैकी ७७६

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News