Magur Fish : खालापूर तालुक्यातील मांगूर माशांचे उत्पादन घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करतानाच संबंधितांवर गुन्हे दाखल करून मांगूर माशांसाठी तयार करण्यात आलेली तळी उद्ध्वस्त करण्यासाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे.
सोमवारपासून कारवाईला प्रारंभ झाला असून महिनाभरात मांगूरमुक्त तालुका करणार, अशी माहिती जिल्ह्याचे सहाय्यक मत्स्य आयुक्त संजय पाटील यांनी दिली. मांगूर संवर्धनात गुंतलेल्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
![Magur Fish](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-Magur-Fish.jpg)
मांगूर मासे सेवन केल्याने कॅन्सर सारखा महारोग होण्याची दाट शक्यता आहे. मानवी आरोग्याला घातक असलेल्या इतर माशांच्या प्रजाती नष्ट करणारा आणि पर्यावरण संवेदनशीलतेला हानीकारक असणाऱ्या मांगूर माशाचे तालुक्यातील पाताळगंगा नदीकिनारी महड, धामणी, माजगाव, कोपरी, मोहोपाडा, टेंभरी, वारद विविध भागांत अवैध मत्स्यपालन करण्यात येत आहे.
मांगूर आरोग्याला हानीकारक असल्याने मांगूर उत्पादनावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी आणली आहे. मांगूर मासे प्रजातीचे उत्पादन करण्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. असे असताना कारवाई होत नसल्याने पाताळगंगा नदी पर्यावरण संवर्धन ट्रस्टच्या वतीने मत्स्यपालन रायगडचे सहाय्यक आयुक्तांकडे १४ मार्च २०२३ रोजी निवेदन दिले होते.
दरम्यान, मनुष्यबळ नसल्यामुळे कारवाई करण्यात येत नसल्याचे सांगितल्याने प्रादेशिक उपायुक्त वांद्रे यांच्याकडे निवेदन दिले. नंतर ७ जून रोजी ई-मेलद्वारे कारवाईसंदर्भात पत्र ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव आणि सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांच्याकडे पाठवले होते.
उग्र वासामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पेण, खालापुरात गुन्हे दाखल बेकायदेशीर ३० टन मांगूर मासे नष्ट केले, तर ३४ जणांवर कारवाई करून पेण, खालापुरात गुन्हे दाखल केले आहेत.
मांगूर नष्ट करण्यात स्थानिकांचा पाठिंबा मिळत नाही; खालापूर तालुक्यात मांगूर नष्ट करण्यासाठी सामाजिक संघटना, पत्रकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाठिंबा मिळाल्याने कारवाई करण्यासाठी मदत होणार असल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली आहे.