Mumbai Real Estate : मुंबईत निवासी जागांची मागणी वाढली ! किमती व ग्राहकांच्या बजेटची…

Ahilyanagarlive24 office
Published:

Mumbai Real Estate : मुंबईतील निवासी जागांच्या मागणीतील वाढ कायम असल्यामुळे शहरातील सरासरी मालमत्ता किमतींमध्ये गेल्या दोन वर्षांत (२०२१ – २०२३) १.७ टक्के संयुक्त दराने वाढ होत आहे तसेच एकूण वाढ १४.४ टक्के आहे,

असे मॅजिकब्रिक्सच्या प्रॉपइंडेक्स रिपोर्ट एप्रिल – जून २०२३ मध्ये दिसून आले आहे. मुंबईत निवासी जागांची मागणी एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीच्या तुलनेत २.८ टक्के वाढली आहे. जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत मागणीमध्ये त्यापूर्वीच्या तिमाहीच्या तुलनेत २.४ टक्के घट झाली होती.

निवासी जागांच्या पुरवठ्यात मागील तिमाहीच्या तुलनेत ४. ३ टक्के घट झाल्यामुळे, मालमत्तेचे सरासरी दर मागील तिमाहीच्या तुलनेत २.१ टक्के वाढले आहे. मुंबईत मध्यम श्रेणीतील मालमत्तांची मागणी (१५,००० -२५,०००) वाढून ४९ टक्क्यांपर्यंत गेली आहे. छोट्या रचनांच्या घरांना ग्राहकांचे प्राधान्य कायम आहे.

त्यामुळे २ बीएचके घरांचा एकूण मागणीतील वाटा ४२ टक्के आहे, तर १ बीएचके घरांचा वाटा ३१ टक्के आहे. याबाबत मॅजिकब्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर पै (सीईओ) म्हणाले की, जागतिक ढोबळ – आर्थिक बाबींमुळे व्याजदरांमध्ये वाढ होऊनही, भारतातील निवासी जागांच्या मागणीत ठोस वाढ दिसून आली आहे.

स्वतःच्या मालकीचे घर असण्याचे महत्त्व आणि त्यासोबत येणारी सुरक्षिततेची भावना यांचा वाढत्या मागणीत मोठा वाटा आहे. अर्थात, अनेक व्यापक बाजारपेठांमधील निवासी जागांच्या किमती व ग्राहकांच्या बजेटची मर्यादा यांमध्ये लक्षणीय असा असमतोल असल्याचेही निरीक्षणास आले आहे. म्हणूनच ही वाढती मागणी, विशेषतः परवडण्याजोग्या घरांची व मध्यम श्रेणीतील घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरवठा तातडीने वाढवण्याची आवश्यकता आहे.

ठाण्यात नोंदवली किंचित वाढ

२०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत ठाणे भागातील निवासी जागांची मागणी स्थिर होती. मागील तिमाहीच्या तुलनेत मागणीत ०.३ टक्के एवढी किंचित वाढ झाली, तर पुरवठ्यामध्ये (सक्रिय सूची) मात्र मागील तिमाहीच्या तुलनेत ९.२ टक्के घट झाली आहे. २०२३ सालाच्या पहिल्या तिमाहीतील घसरणीनंतर, दुसऱ्या तिमाहीत सरासरी दरांमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत १.७ टक्के अशी स्थिर वाढ दिसून आली.

मागणीमध्ये मोठा म्हणजे ३७ टक्के वाटा २ बीएचके घरांचा होता, तर पुरवठ्यातही २ बीएचके घरांचा वाटा ४३ टक्के होता. ठाण्यातील मालमत्तेचे सरासरी दर २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीपासून १०.७ टक्क्यांनी वाढले आहेत. २०२१ ची दुसरी तिमाही ते २०२१ ची तिसरी तिमाही या काळात ९.९ टक्क्यांची तीव्र घसरण झाल्यानंतर आता त्यात सातत्याने वाढ होत आहे.

वाशी, पनवेल व खारघर आघाडीचे भाग

२०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत नवी मुंबईतील मागणीमध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत २.१ टक्के वाढ दिसून आली, तर पुरवठा (सक्रिय सूची) मागील तिमाहीच्या तुलनेत ८.८ टक्क्यांनी घटला आहे. नवी मुंबईतील मालमत्तेचे सरासरी दर मागील तिमाहीच्या तुलनेत २.३ टक्क्यांनी वाढले आहेत.

निवासी जागांच्या मागणीवर २ बीएचके घरांचे वर्चस्व राहिले, एकूण मागणीत या घरांच्या मागणीचा वाटा ५२ टक्के होता, तर एकूण पुरवठ्यामधील वाटा ४९ टक्के होता. मॅजिकब्रिक्समधील ग्राहकांनी केलेल्या शोधानुसार, वाशी, पनवेल व खारघर हे तीन आघाडीचे निवासी भाग (लोकॅलिटी) ठरले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe