आषाढ वारीत एसटीने दहा दिवसांत कमविले इतके कोटी उत्पन्न

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : देवशयनी आषाढी एकादशी वारी दरम्यान राज्य परिवहन महामंडळाच्या अहमदनगर विभागाने मागील काळातील उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

उत्कृष्ट नियोजनातून आणि अधिकारी, कर्मचारी, वाहक- चालक यांच्या सामूहिक प्रयत्नातून अहमदनगर विभागाने दहा दिवसाच्या काळात रापमंच्या तिजोरी तब्बल दोन कोटी १६ लाख २३ हजार रुपयांचे उत्पन्न जमा केले आहे.

वारीसाठी नगर विभागाच्या २३६ बसेस पंढरपूरसाठी तैनात होत्या. या बसेसनी एकूण एक हजार ८४९ फेऱ्या केल्या. एकूण एक लाख ६५ हजार २५० प्रवाशांनी लालपरीचा सुरक्षित आधार घेत पंढरीची वारी केली. आषाढी एकादशी हा महाराष्ट्र जनमानसातील सर्वात मोठा सोहळा मानला जातो.

ज्ञानोबा-तुकोबांच्या वचनावरती नितांत श्रद्धा ठेवून महाराष्ट्राने भागवत धर्माची पताका पिढ्यानपार सांभाळली. पावसाळ्याचे दिवस सुरू होताच मने धावू लागतात ती पंढरीच्या दिशेने ! दरवर्षी वारकरी भक्तांची वारी सुखकर व्हावी म्हणून राज्य परिवहन महामंडळाची एसटी धावत असते.

वारीच्या या प्रवासी गर्दीची शक्यता लक्षात घेऊन रापमंच्या वतीने वारी यात्रेदरम्यान एसटी बसेसच्या फेऱ्यांचे नियोजन केले जाते. यावर्षी वारकऱ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन रापमंच्या अहमदनगर विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी विभागीय वाहतूक अधिकारी अनिल भिसे, विभागीय वाहतूक अधीक्षक अविनाश कल्हापुरे, यंत्र अभियंता मुकुंद नगराळे,

कामगार अधिकारी बाळासाहेब एकशिंगे, सहाय्यक वाहतूक अधीक्षक चंद्रकांत खेमनर, तारकपूर आगार प्रमुख अभिजीत आघाव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आगार प्रमुख, अन्य वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांच्या माध्यमातून आषाढी वारीसाठीचे नियोजन केले. वारीच्या या नियोजनाची माहिती लोकांपर्यंत प्रसारमाध्यमातून पोहोचविण्यात आली.

उत्कृष्ट नियोजन आणि त्या नियोजनानुसार वाहक-चालक आणि सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी केलेले परिश्रम यामुळे अहमदनगर विभागाने रापमंच्या इतिहासात आजपर्यंतचे उच्चांकी उत्पन्न मिळवले आहे.

वारीसाठी विशेष बस फेऱ्यांचे नियोजन दि. २४ जून ते ४ जुलैपर्यंत करण्यात आले होते. या कालावधीमध्ये जिल्ह्यातील अकरा आगारातून २३६ बसेस तैनात होत्या. यात्रा काळात दहा दिवसाच्या अवधीत या बसेसनी एकूण एक हजार ८४९ फेऱ्या केल्या.

तब्बल तीन लाख ९२ हजार ८६६ किलोमीटर अंतर या बसेस धावल्या. दहा दिवसाच्या काव्यात ४६ हजार ८९५ मोठे, दोन हजार ८४२ लहान, १४ हजार ७९३ ज्येष्ठ, ६३ हजार अमृत आणि ३७ हजार ६५८ महिला अशा एकूण एक लाख ६५ हजार २५० प्रवाशांनी या नियोजनाचा लाभ घेत नगर विभागाच्या लालपरीतून पंढरीची वारी केली.

यातून नगर विभागाने राज्य परिवहन महामंडळाच्या तिजोरीमध्ये दहा दिवसाच्या काळात तब्बल दोन कोटी १६ लाख २३ हजार 5५४ रुपयाचे उत्पन्न जमा केले. आषाढी वारी काळातील हे आजपर्यंतचे नगर विभागाचे हे विक्रमी उत्पन्न आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe