ST News : एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासनाप्रमाणे वाढीव महागाई भत्ता मिळावा, या मागणीबाबत शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त केले.
मात्र प्रत्यक्षात ४ टक्के महागाई भत्ता अद्याप प्रलंबित आहे. कर्मचारी महागाई भत्ता मिळण्याच्या प्रतीक्षेत असून वारंवार याबाबत विचारणा केली जात आहे. परंतु शासन आणि महामंडळ दोघेही कर्मचाऱ्यांची चेष्टा करत असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना १९९२ पासून शासनाप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो. त्यामुळे अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्र्यांनी फक्त त्याची उजळणी केली असल्याचे संघटनेचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.
प्रत्यक्षात मात्र ४ टक्के महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही. शासनाच्या कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२३ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता दिला आहे. त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा भत्ता मिळायला हवा होता. पण तो मिळालेला नसून ही गंभीर बाब असल्याचे एसटी कर्मचारी संघटनांकडून बोलले जात आहे.