Navi Mumbai News : स्वच्छ व सुंदर शहराप्रमाणेच ‘उद्यानांचे शहर’ ही नवी मुंबईची एक वेगळी ओळख आहे. १०९ चौकिमी महापालिका क्षेत्रात २२५ हून अधिक उद्याने व सुशोभित जागा नवी मुंबईत आहेत.
नवी मुंबईतील अनेक उद्याने विशिष्ट संकल्पना घेऊन ‘थीम पार्क’ म्हणून महापालिकेने विकसित केली आहेत. त्यामध्ये बेंचेस, कारंजे, खेळणी अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे केवळ नवी मुंबईकरांचीच नाही तर नवी मुंबईला भेट देणाऱ्या इतर शहरातील नागरिकांचीही पसंती या उद्यानांना मिळत आहे.
या उद्यानांचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी तसेच तेथील सोयीसुविधांचा नागरिकांना लाभ घेता यावा, यासाठी उद्यान विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले. विरंगुळ्याची आकर्षक ठिकाणे म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवी मुंबईतील उद्यानांची वैशिष्ट्यपूर्णता टिकून राहावी याकरिता पालिका आयुक्त राजेश नार्वेकर अत्यंत दक्ष आहेत.
या उद्यानांची स्थिती उत्तम राहावी यादृष्टीने उद्यान विभाग आणि अभियांत्रिकी विभाग यांची संयुक्त बैठक घेत आयुक्तांनी दोन्ही विभागांनी परस्पर समन्वयाने उद्याने अधिक उत्तम होण्यासाठी सर्वतोपरी कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त नितीन नार्वेकर, उद्यान विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
टॉय ट्रेन सुरू करण्याच्या सूचना
पावसाळी कालावधीत उद्यानांची विशेष दक्षता घेण्याची गरज विशद करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी देखभाल-दुरुस्तीची कार्यवाही अधिक काटेकोर करावी व संबंधित कंत्राटदारांना सतर्क राहण्याचे निर्देश द्यावेत, अशा सूचना दिल्या.
अशाच प्रकारे खेळणी दुरुस्तीसाठी प्रत्येक विभागाकरता वेगळे वार्षिक कंत्राट करून खेळणे नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते त्वरित दुरुस्त करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी असे निर्देश दिले. तसेच उद्यानांमधील ओपन जीमच्या दुरुस्तीबाबतही दक्षता घेण्याचे आयुक्तांनी सूचित केले. उद्यानांमधील टॉय ट्रेन कार्यान्वित करण्याबाबतही आयुक्तांनी सूचना दिल्या.
उद्यान विभागाला दक्षतेचे आदेश
प्रत्येक शहराची काही वैशिष्ट्ये असतात. त्या वैशिष्ट्यांमुळेच शहराच्या नावलौकिकात भर पडत असते. नवी मुंबईतील सर्वच उद्याने ही नागरिकांची आकर्षण केंद्रे असून हा नावलौकिक टिकवून ठेवण्यासाठी व तो वाढविण्यासाठी उद्यान विभागाने दक्षतेने कार्यरत राहणे गरजेचे आहे याची जाणीव करून देत त्यादृष्टीने सतर्क राहण्याचे निर्देश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी उद्यान व अभियांत्रिकी विभागास दिले.