मुंबईतील ह्या बागेने वर्षभरात कमविले ११ कोटी ! २९ लाख पर्यटकांनी…

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : राणीबागेत पर्यटकांची रोज गर्दी वाढत आहे. मागील १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत तब्बल २८ लाख ५५ हजार ४१८ पर्यटकांनी प्राण्यांच्या धमाल मस्तीचा आनंद लुटला,

तर पर्यटकांच्या माध्यमातून प्राणिसंग्रहालयाची ११ कोटी १७ लाख ३७ हजारांची रेकॉर्ड ब्रेक कमाई झाली. पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा उच्चांक व रेकॉर्ड ब्रेक कमाई राणीबागेच्या इतिहासात प्रथमच झाल्याचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले.

दक्षिण मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांचे आकर्षण आहे. उद्यान व प्राणिसंग्रहालयात १५ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारचे १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत.

या शिवाय २५६ प्रजातींचे आणि ६६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तर रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीसह मोठ्यांचेही राणीबाग आकर्षण ठरले आहे. राणीबागेत दररोज ७ ते ८ हजार पर्यटक भेट देतात.

सणासुदीच्या काळात, सार्वजनिक सुट्टी व शनिवार व रविवारी तर पर्यटकांचा आकडा २५ ते ३० हजारांपर्यंत जातो. पर्यटकांची होणारी गर्दी पहाता अनेक वेळा राणीबागेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ प्राणिसंग्रहालयावर येते.

राणीबागेच्या इतिहासात प्रथमच १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत २८ लाख ५५ हजार पर्यटकांनी भेट दिली असून, ११ कोटींचा महसूल जमा झाल्याचे ते म्हणाले.१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ महसूल व पर्यटकांची संख्या पर्यटक – २८,५५, ४१८ महसूल – ११ कोटी १७ लाख ३७ हजार ३८६

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe