Vande Bharat Express : २८ जूनपासून मुंबई – गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला दिवसागणिक चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाढत्या प्रतिसादामुळे या ट्रेनचे डबे वाढवण्याच्या म्हणजेच ८ ऐवजी १६ डब्यांची ट्रेन करण्याच्या हालचाली मध्य,
कोकण रेल्वेकडून सुरू झाल्या असून तसा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ जून रोजी मडगाव-मुंबई वंदे भारत ट्रेनचे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केले.
![Vande bharat Express](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/07/ahmednagarlive24-Maharashtra-News-09.jpg)
२८ जूनपासून सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत आली. पहिल्याच फेरीत एकूण ५३३ आसन क्षमता असणाऱ्या या ट्रेनमध्ये ४७७ आसने फुल्ल झाली होती.
मुंबई – मडगाव वंदे भारत ट्रेन गेल्या महिन्यात ९३.११ टक्के क्षमतेने धावत होती. तर, जुलै महिन्यात ९१.४४ टक्क्यांनी धावत आहे. तसेच गणपतीसाठी वंदे भारत ट्रेनचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने मुंबई-मडगाव वंदे भारत ट्रेनच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
या ठिकाणी झाले १६ डब्यांचे ८ डबे
मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सोलापूर-मुंबई वंदे भारत ट्रेन, मुंबई -साईनगर शिर्डी आणि नागपूर-बिलासपूर वंदे भारत ट्रेन सोळा डब्यांच्या धावत होत्या. यापैकी नागपूर-बिलासपूर वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे ८ डब्यांची केली आहे. सोळा डब्यांऐवजी आता नागपूर- बिलासपूर वंदे भारत ट्रेन आठ डब्यांची चालवण्याचा निर्णय घेण्यात आला.
उर्वरित आठ डबे दुसरीकडे पाठवण्यात आले होते. मात्र, कोकण मार्गावरील वंदे भारत ट्रेनला प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ८ डब्यांच्या जागी १६ डब्यांची करण्याचा विचार सुरू आहे.
याबाबत रेल्वे बोर्ड निर्णय घेईल. डबे वाढवणे अथवा इतर महत्त्वाचे निर्णय बोर्डाकडून कळवण्यात येतात. अद्याप तसा प्रस्ताव आमच्याकडून गेलेला नाही. – डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे