Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्या मुलींची तिसगावमधील टवाळखोर तरुण सातत्याने छेड काढत असल्यामुळे अनेक मुलींच्या पालकांनी व नातेवाईकांनी शनिवारी माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांची तिसगाव येथे भेट घेऊन मुलींची भरस्त्यावर छेड काढणाऱ्या या टवाळखोरांचा बंदोबस्त करा
अन्यथा आम्ही आमच्या मुली शाळेत पाठवणार नाहीत अशा संतप्त भावना कर्डिले यांच्यापुढे व्यक्त केल्या. गेल्या महिनाभरापासून शिरापूर, हनुमानटाकळी, मांडवे, तिसगाव येथील शालेय विद्यार्थिनींची तिसगावमधील टवाळखोर तरुण भररस्त्यावर छेड काढत असल्याच्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे विद्यार्थिनींसह पालकामध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे पालकांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. बाहेरगावाहून तिसगावमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असलेल्या मुली शाळा सुटल्यानंतर सुरक्षित घरी येतील का, असा प्रश्न संबंधित मुलींच्या कुटुंबाला सध्या भेडसावत आहे.
शनिवारी याच प्रकरणासंदर्भात काही पालकांनी तिसगावमध्ये घडणाऱ्या या घटनांकडे माजीमंत्री कर्डिले यांचे लक्ष वेधले. तुम्हीच आम्हाला न्याय देऊ शकता, अशा शब्दांत काही पालकांनी आपल्या भावना केल्या. या वेळी कर्डिले यांनी दोन दिवसांत पोलीस अधिकारी, शिक्षण संस्थेचे प्रमुख व परिसरातील ज्या गावातील मुली या तिसगावच्या विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत आहेत,
तेथील सरपंच, उपसरपंच, सर्व प्रमुख व्यक्तींसोबत सामूहिक मिटींग आयोजित करून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत, याची दखल घेतली जाईल. या टवाळखोर तरुणांना धडा शिकवण्यासाठी निश्चित सर्व विद्यार्थी व पालकांसोबत मी असल्याचे कर्डिले या वेळी म्हणाले.