Ahmednagar Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यावर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील भेटलो. त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम आहे,
असे मत राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. शनिवारी सायंकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार काळे बोलत होते. रयत शिक्षण संस्थेवर तुम्ही काम करत आहात, मात्र या संस्थेत आपण राजकारण करत नाही,
याची काळजी घ्या, असा सल्ला यावेळी शरद पवार यांनी दिल्याचे आ. काळे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या राजकारणात २ जुलै रोजी राजकीय भूकंप झाला. शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यातही उलथापालथ सुरू असताना आमदार काळे परदेश दौऱ्यावर होते. बुधवारी आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा देत, त्यांच्या गोटात दाखल झाले. जेष्ठ नेते शरद पवारांशी कर्मवीर शंकरराव काळे व रयत शिक्षण संस्था, असा तीन पिढ्यांचा संबंध पाहता, आमदार काळे यांची भूमिका हा ज्येष्ठ नेते शरद पवारांना मोठा झटका होता;
परंतु थेट भेट झाली नसल्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट होत नव्हती, ” त्यामुळे ही संभ्रमावस्था होती. शनिवारी सायंकाळी कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर प्रसारमाध्यमांशी त्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत खुलासा करताना आ. काळे यांनी सांगितले,
की परदेशात असताना नामदार अजित पवारांचा फोन आला होता. कुठे आहे ? त्यांनी विचारलं. मी त्यांना सांगितल्यावर आल्यावर माझी भेट घे, एवढेच त्यांनी सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी सोशल मीडियावर राज्यातील घडामोडी समजल्या.
परदेशात जाण्यापूर्वी असे काही घडेल, याची कल्पनासुद्धा नव्हती, ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत, यावर अनेकांचा विश्वास अद्यापही बसलेला नाही, अशी प्रतिक्रिया आमदार काळे यांनी व्यक्त केली आहे.