Mumbai Rain : मागील तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने जोर धरला असून बुधवारी संततधार कोसळल्याने सखल भागात पाणी साचले. रस्ते वाहतूक मंदावली, तर रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
भांडुप येथे घर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. पालिकेने पाणी साचणाऱ्या ठिकाणी यंत्रणा सज्ज ठेवली होती. येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मागील काही दिवस पावसाने उसंत घेत सोमवारपासून मुंबई व परिसरात दमदार हजेरी लावली आहे. बुधवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू राहिल्याने दादर, परळ, अंधेरी, चेंबूर शेल कॉलनी, मानखुर्द, वांद्रे, सायन गांधी मार्केट, किंग्ज सर्कल आदी सखल भागात पाणी साचले.
पावसाने संततधार सुरू ठेवल्याने रस्ते वाहतूक जाम झाली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मध्य रेल्वेवर डोंबिवलीच्या पुढे रुळावर पाणी भरल्याने कल्याण, बदलापूर, कसारापर्यंत रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले.
रस्ते वाहतूकही जाम झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने मुंबई महापालिकेने पाणी भरणार्या ठिकाणी आपली यंत्रणा सज्ज ठेवली होती. दुपारी समुद्रात ४.२५ मीटर उंचीची भरती होती. त्यामुळे समुद्राला उधाण आले होते.
त्यामुळे समुद्र परिसरात येण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती. पाणी भरणाऱ्या ठिकाणी पाण्याचा तत्काळ निचरा करण्यासाठी पालिकेने पंपाची व्यवस्था केली होती. दुपारनंतर काही वेळ पावसाने उसंत घेतल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा झाला.
रस्ते वाहतूकही सुरळीत होण्यास मदत झाली. मात्र सायंकाळी पाचनंतर पावसाने पुन्हा जोर धरला. पावसाचा संध्याकाळी जोर वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकारी व काही खासगी कार्यालये वेळेआधी बंद करण्यात आली. कर्मचारी, कामगारांनी खासगी वाहने,
बस व रेल्वे मिळेल त्या वाहनाने घर गाठण्यासाठी धावपळ केली. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने आल्याने रस्ते जाम झाले होते. हार्बर, मध्य रेल्वेची बाहतून उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती.
हवामान विभागाने गुरुवारी व शुक्रवारी म्हणजे पुढील दोन दिवस मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे उद्या, परवाही जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ५० ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. त्यामुळे सखल भागात पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
२७ ठिकाणी झाडे पडली
मुसळधार पावसामुळे मुंबई शहरात ८ ठिकाणी, पूर्व उपनगरात ४, तर पश्चिम उपनगरात १५ ठिकाणी अशा एकूण २७ ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. यात कोणालाही मार लागलेला नाही.
ठाणे
■ ठाण्यात काही ठिकाणी नाल्यांचे पाणी रस्त्यावर सखल भागात पाणी साचले.
■डोंबिवलीतील रस्ते पाण्याखाली,स्टेशन परिसरात कमरेएवढे पाणी.
■उल्हासनगरमधील सखल भागात पाणी तुंबले.
■बदलापूरमध्ये रस्त्यांना नद्याचे स्वरूप.
■वालधुनी नदीला आलेल्या पुरामुळे अंबरनाथच्या पुरातन शिवमंदिर परिसरात पाणी.
■कल्याणमधील बारवी, उल्हास, भातसा व काळू नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा.
■मुरबाड-कल्याण मार्गावरील रायते पूल पाण्याखाली गेल्याने सर्व वाहतूक बदलापूरमार्गे वळवली.
■माळशेज घाटातही मुसळधार, वाहतुकीचा वेग मंदावला.
पालघर
■वसईपासून घोडबंदरपर्यंतमुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पाणी, वाहतूक अनेक ठिकाणी खोळंबली.
■ पालघर स्टेशन ते उमरोळीदरम्यान रुळावर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेवरील अप आणि डाऊन मार्गावरच्या गाड्या रखडल्या.
■ केळवा रोड स्थानकाबाहेर उभ्या केलेल्या पन्नासहून अधिक दुचाकी पाण्याखाली.