Lavasa Hill Station : लवासा हिल स्टेशनची १८१४ कोटींना विक्री

Ahmednagarlive24 office
Published:
Lavasa Hill Station

Lavasa Hill Station : राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) लवासा या देशातील पहिल्या खाजगी हिल स्टेशनची डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरला विक्री करण्यासाठी मान्यता दिली आहे.

एनसीएलटीने दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुमारे ५ वर्षांनी लवासा या खासगी हिल स्टेशनसाठी १८१४ कोटी रुपयांच्या रिझोल्युशन योजनेला मंजुरी दिली आहे. एनसीएलटीच्या आदेशामध्ये सादर करण्यात आलेल्या निराकारण योजनेला डार्विनच्या कर्जदारांनी मान्यता दिली आहे.

या मान्यतेनंतर आता डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्टक्चर लिमिटेड कंपनी लवासा कॉपोर्रेशन लिमिटेडची खरेदी करणार आहे. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी प्रामुख्याने पुण्यातील खाजगी हिल स्टेशनच्या व्यवसायात गुंतलेली आहे. लवादाने शुक्रवारी दिलेल्या २५ पानांच्या आदेशात १८१४ रुपयांच्या गुंतवणुकीच्या योजनेला मंजुरी दिली.

या रकमेमध्ये १४६६.५० कोटी रुपयांच्या निराकरण योजनेच्या रकमेचा समावेश आहे. या रकमेतून कॉपोर्रेट कर्जदाराला हप्त्यांमध्ये दिलेली रक्कम दिली जाईल. या रिझोल्युशन योजनेच्या देखरेखीसाठी एक समिती नेमली जाणार आहे.

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील बहुचर्चित लवासा प्रकल्प विकत घेण्याच्या या निर्णयामुळे सध्या अडचणीत असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हजारो गुंतवणूकदारांना दिलासा मिळणार आहे. परिणामी, या प्रकल्पाच्या पुढील टप्प्याच्या कामाला सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe