Maharashtra News : शेतकऱ्यांचे कपात केलेले पैसे ‘ज्ञानेश्वर’ कडून परत

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी शेतकऱ्यांचे सन २०२१-२२ चे उसाचे पेमेंटमधून कपात केलेली प्रतिटन १०९ रुपये ही रक्कम जनशक्ती विकास आघाडीने दिलेल्या लढ्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती अॅड. शिवाजीराव काकडे यांनी दिली.

अॅड. काकडे म्हणाले की, ज्ञानेश्वर कारखान्याने सन २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांकडून प्रतिटन १०९ रुपये अनधिकृतपणे पेमेंटमधून कपात केली होती. ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी ऑक्टोबर २०२२ रोजी भातकुडगाव येथे शेतकऱ्यांच्या झालेल्या मेळाव्यात कपात झालेली रक्कम परत मिळावी,

अशी मागणी केली होती. तसेच शहरटाकळी येथील शेतकरी भागचंद कुंडकर, सुनील गवळी, भाऊसाहेब राजळे, मनोज घोंगडे यांच्यासह जनशक्तीच्या कार्यकत्यांनी या मागणीसाठी प्राणांतिक उपोषण केले होते. त्यावेळी साखर संचालकांनी तोंडी आश्वासन दिले होते.

त्यानंतर जनशक्तीने प्रादेशिक सहसंचालकाकडे कपात केलेल्या रकमेची मागणी केली. या वेळी कारखानदार व तक्रारदारांचे जबाब घेण्यात आले होते. रक्कम परत करता येणार नाही, ती ठेवीत वर्ग केली व जनरल मीटिंगमध्ये तसा ठराव कारखान्याने घेतला,

असा बचाव कारखान्याने सदर केसमध्ये केला. तर तक्रारदार शेतकऱ्यांच्या वतीने अॅड. शिवाजीराव काकडे यांनी स्वतः केस चालवली व शेतकऱ्यांचे उसाचे एफआरपी मधून परस्पर कपात करता येत नसतात. कारखान्याने ऊस नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या घेतलेल्या सह्यांचा गैरवापर केलेला आहे.

करारनामासुद्धा जनरल असून, स्वतंत्रपणे करारनामा केलेला नाही. शेतकऱ्यांच्या प्रत्येक पानावर सह्या नाहीत, असे अनेक मुद्दे प्रभावीपणे मांडले व त्यांचा निकाल दि. २५ मे २०२३ रोजी प्रादेशिक सह संचालकांनी शेतकऱ्यांचे कपात केलेले रुपये १०९ परत देण्याचे आदेश कारखाना प्रशासनास दिले होते.

आता त्याची अंमलबजावणी कारखान्याने केली आहे. सदरची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे. ज्यांची रक्कम मिळाली नसेल त्यांनी जनशक्ती कार्यालयाकडे संपर्क करावा, असेही काकडे यांनी म्हटले आहे. या वेळी जगन्नाथ गावडे, सुरेश चौधरी, भागचंद कुंडकर, भाऊसाहेब राजळे, वैभव पुरनाळे, सुनील गवळी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

मला या निर्णयाने ३४ हजार रुपये मिळाले आहेत. त्यामुळे माझे बियाणे, खते यांचा खर्च भागला. अन्यथा मला लोकांकडून व्याजाने पैसे घ्यावे लागले असते. अॅड. शिवाजीराव काकडे व सौ. हर्षदाताई काकडे यांच्यामुळेच *मला पैसे मिळू शकले. : कृष्णा गवळी, शेतकरी, शहरटाकळी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe