Maharashtra News : धारावीत उभे राहणार भीम थीम पार्क…

Ahilyanagarlive24 office
Published:

Maharashtra News : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने धारावी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ भीम थीम पार्क बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी सल्लागारासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून दक्षिण मुंबईतील इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्यात येत आहे. जागतिक दर्जाच्या या स्मारकाबरोबरच एमएमआरडीएने धारावी – माहीम परिसरात भीम थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

माहीम स्थानकाजवळील मोकळ्या भूखंडावर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. सध्या या भूखंडावर मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य केंद्र चालवण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या विविध घटनात्मक अधिकारांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट्य या स्मारकाच्या माध्यमातून साध्य करण्यात येणार आहे.

राज्यघटनेवरील डिजिटल ग्रंथालय, विद्यार्थी वाचू शकतील व संशोधन करू शकतील, असे स्वरूप या स्मारकाचे असणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनाची जागा, उद्यान व इतरांसाठी एक जागा असा प्रस्ताव मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व धारावीच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मांडला आहे. २०२० रोजी १४ कोटींच्या या प्रकल्पासाठी समाजकल्याण मंत्रालयाकडून निधी मिळवण्यात यश आले आहे.

मात्र, सत्तांतर झाल्यामुळे प्रकल्प रखडल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एमएमआरडीएने मात्र आता प्रकल्पाला चालना दिली असून, सल्लागाराच्या नियुक्तीसाठी निविदा मागवल्या आहेत. भीम थीम पार्क प्रस्तावित असलेला भूखंड मुंबई महानगरपालिकेचा असून, सर्व काही योजनेनुसार झाले तर येत्या काही दिवसांत भूखंड हस्तांतरणाचा प्रस्ताव एमएमआरडीएकडून पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe