New Sand Poliicy : सरकारचे नवे वाळू धोरण अपयशी !

New Sand Poliicy : शासनाच्या नव्या वाळू धोरणानुसार, ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू विक्रीला सुरुवात झाल्यावर त्यास नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला; परंतु मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात शासन यंत्रणेला अपयश येत आहे.

वाळूसाठा शिल्लक नसल्याने एक डेपो बंद करावा लागला. उर्वरित दोन सुरू असलेल्या डेपोत केवळ ५ हजार ब्रास वाळू साठा शिल्लक आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते संभाजीनगर जिल्ह्यातील झोलेगाव येथील शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन २० मे रोजी झाले.

मराठवाड्यात सुरू होणारा हा पहिला वाळू डेपो ठरला. वाळूसाठा करण्यासाठी काही दिवस गेल्यानंतर मे अखेर या डेपोतून विक्री सुरू झाली. खरे तर शासनाच्या नव्या वाळू धोरणानुसार, जिल्ह्यात यावर्षी सात वाळू डेपो उघडण्याचे व त्यातून सूमारे ८९ हजार ९२० ब्रास वाळूची विक्री करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता.

या डेपोसाठी प्रशासनाने दोन वेळा निविदा मागवल्या. वेळोवेळी निविदांना मुदतवाढही दिली; परंतु वाळू डेपोसाठी कंत्राटदारांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या निविदांच्या वेळी वैजापूर तालुक्यातील झोलेगाव, कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी आणि फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंडी या तीन वाळू डेपोंसाठी निविदा प्राप्त झाल्या होत्या.

प्रशासनाने सर्वात कमी दर असणाऱ्या निविदा अंतिम केल्या. यात झोलेगाव येथून १७, २९६, देवगाव रंगारी येथून ३,६५६, तर गेवराई गुंगी येथून १६,६०८ ब्रास वाळू उचलण्यात येणार होती; परंतु निविदा प्रक्रियेस लागलेला वेळ व वाळू उत्खनन करण्यास मिळालेला कमी वेळ यामुळे या तीनही डेपोत ९ जूनपर्यंत २९ हजार ३३३ ब्रास वाळूचा साठा करता आला.

लवकरच ‘नो स्टॉक’चे बोर्ड लागणार?

दरम्यान, नवीन वाळू धोरणास स्वस्त दराने वाळू मिळत असल्याने नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बुकिंग जोमाने झाली. यात आतापर्यंत ३ हजार २१५ जणांनी २७ हजार २०४ ब्रास वाळू खरेदीसाठी बुकिंग केली असून प्रत्यक्ष २४ हजार १०६ ब्रास वाळू डेपोतून नेली, तर २ हजार ०२९ ब्रास वाळू खरेदीदारांनी अद्याप नेलेली नाही. परिणामी, डेपोत आता केवळ ५ हजार ३७ ब्रास वाळूचा साठा शिल्लक राहिला, असे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. शासनाने प्रयत्न करूनही वाळूसाठा पुरेशा प्रमाणात न झाल्याने वाळू डेपोवर लवकरच ‘नो स्टॉक’ चे बोर्ड लावावे लागतील, अशी चिन्हे दिसत आहेत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe