Malshej Ghat : मुरबाड- कल्याण-नगर या राष्ट्रीय महामार्गावर असलेला माळशेज घाट पर्यटकांचा लाडका. पण यंदाच्या पावसाळ्यात हा घाट हिरव्या शालूने नटलेला असला तरी धबधबे पर्यटकांविना सुने सुने झाले आहेत आणि पावसाळ्यात तिथे छोटेमोठे व्यवसाय करणारे आदिवासी बांधव सुन्न झाले आहेत.
कारण या परिसरात सध्या १४४ कलमाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. टोकावडे पोलीस ठाण्याची टीम माळशेज घाटात सकाळपासून ते रात्रीपर्यंत गस्त घालत आहे.
घाटात धबधबे आहेत, त्या ठिकाणी सुद्धा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. माळशेज घाटाच्या पायथ्याशी आदिवासी बांधव घाटातील रस्त्याच्या कडेला छोटे-मोठे स्टॉल्स तयार करून तेथे रानभाजी तसेच चहा, वडापाव इत्यादी पदार्थ विकून आपला उदरनिर्वाह करत असतात.
या व्यावसायिकांसाठी तरी काही प्रमाणात पर्यटकांना बंधने पाळून येथे पावसाचा आनंद घेऊ द्यावा अशी मागणी करत पर्यटकांची गर्दी प्रशासनाच्या निर्बंधामुळे ओसरली आहे. त्यामुळे स्थानिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. या आदिवासी कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, असे आवाहन केले जात आहे.