Pikvima : खरीप हंगामात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानासाठी राज्य शासनाकडून ‘एक रुपयात पीक विमा योजना राबवली जात आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून २४ जुलैपर्यंत राज्यातील १ कोटी ६८ हजार ३४९ शेतकऱ्यांनी या योजनेतून आपल्या शेतपिकांचा विमा काढल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत दिली.
पेरण्या रखडल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासंदर्भातील सूचना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नियम ९३ अन्वये विधान परिषदेत मांडली. यावेळी उत्तर देताना मंत्री मुंडे बोलत होते.
ते म्हणाले, राज्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, या दृष्टीने कृषी विभागाचे नियोजन सुरू आहे. या योजनेविषयीची जनजागृती शेतकऱ्यांमध्ये व्हावी, या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्न करत आहे.
आज दररोज सहा ते सात लाख शेतकरी या योजनेंतर्गत आपल्या शेतपिकांचा विमा उतरवत आहेत. २४ जुलैपर्यंत राज्यातील एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी या ‘एक रुपयात पीक विमा’ योजनेचा लाभ घेतला आहे.
यावेळी शेकापचे सदस्य जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांकडून ‘एक रुपया’ तरी कशासाठी घेता, सर्वच शेतकऱ्यांचा विमा सरकारकडून विनामूल्य काढण्यात यावा, अशी मागणी केली. यावर या योजनेसाठी ‘एक रुपया’ विमा भरला आहे, ही जाणीव शेतकऱ्यांना व्हावी यासाठी या योजनेची रक्कम एक रुपया ठेवण्यात आल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.