Ahmednagar News : सध्या पावसाळा सुरु झाला असून मनपा आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्य संदर्भात कोणत्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाही. त्यामुळे शहरात साथीचे आजार पसरले असून, नागरिक तापाने फणफणले आहेत. शहरात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, सर्दी, खोकला, डोकेदुखी, घसादुखी थंडी ताप अशा आजाराने नागरिक हैराण झाले आहे. मनपाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी धूर व औषध फवारणी होणे गरजेचे होते.
मात्र तसं न झाल्याने शहरात डेंगू सदृश्य आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मनपाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील सर्व दवाखाने हाउसफुल झालेत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची आर्थिक परिस्थिती नसल्याने रुग्ण आजाराकडे दुर्लक्ष करत आहे, आणि त्यातूनच आणखी आजार वाढत आहेत. संपूर्ण शहर हे साथीच्या आजारांच्या भक्षस्थानी आलेले आहे या साथीच्या आजारावर नियंत्रण न आणल्यास तित्र आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी कॉँग्रेस महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे यांनी दिला.

शहरातील साथीच्या आजारांवर उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने मनपा आयुक्त यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे यांच्यासह सुनंदा कांबळे, सुनिता पाचारणे, साधना बोरुडे, शितल राऊत, गीता कामत, दिपाली आढाव, सुवर्णा गिऱहे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
निवेदनात पुढे नमूद कारण्यात आले की, अहमदनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नगर शहरामधील व कोणत्याही भागामध्ये धुर फवारणी चालू नसल्याने शहरामध्ये साथीचे आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर सुरु झाले आहे. धुर फवारणी मशीन आरोग्य विभागाच्या स्टोअरमध्ये धुळखात पडलेल्या अवस्थेत आहेत. वेळीच या धुर फवारणी मशीन व औषध फवारणी मशीन चालु ठेवल्या असत्या तर आज शहरामध्ये साथीचे आजार जसे की, मलेरिया, हिवताप, चिकनगुण्या पसरले नसते.
अहमदनगर महानगरपालिकेचा आरोग्य विभागाच कोमात असल्यामुळे. हे सर्व साथीचे आजार हे डासांमुळे होत असल्यामुळे व या डासांवर आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे नगरकरांवर या साथीच्या आजाराचे संकट ओढावले आहे. त्यामुळे संपुर्ण शहरामध्ये तातडीने धुर फवारणी व औषध फवारणी सुरु करावी
व या साथीच्या आजारावर नियंत्रण आणावे. धुर फवारणी व औषध फवारणी करण्यास विलंब केल्यामुळे संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. येत्या सात दिवसांमध्ये संपूर्ण शहरामध्ये साथीच्या आजारावर नियंत्रण येण्यासाठी धुर फवारणी व औषध फवारणी सुरु न झाल्यास तित्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त यांना राष्ट्रवादीच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे.