MLA Rohit Pawar : कर्जत – जामखेड मतदारसंघाच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेल्या एमआयडीसीला अंतिम मंजुरी मिळावी, या मागणीसाठी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना सोमवार, दि. २४ रोजी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मौनव्रत आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाकडे मतदारसंघासह राज्याचे लक्ष वेधले गेले होते. कर्जत -जामखेडची जनता व युवकांवर होणारा अन्याय थांबून तत्काळ एमआयडीसीला मंजुरी द्यावी, अशी मागणी आ. पवार यांनी केली आहे.
गेल्या कित्येक महिन्यांपासून शासन दरबारी आ. पवार यांचा पाठपुरावा सुरू होता. याबाबत वेळोवेळी त्यांनी उद्योगमंत्री, मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना याबाबत निवेदनही दिले होते; परंतु, शासनाने त्यावर कोणतीही कारवाई केली नाही.
त्यानंतर मंजुरी न मिळाल्यास आपण आंदोलन करू, असा इशारा सरकारला दिल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पावसाळी अधिवेशनात एमआयडीसीचा मुद्दा मार्गी लावू, असे आश्वासन दिले, त्यावेळी आ. पवार यांनी आपले उपोषण स्थगित केले होते.
परंतु पावसाळी अधिवेशन सुरू होऊन आठवडा उलटून गेला तरीही अद्याप यावर कोणत्याही चर्चा करण्यात आलेली नाही, त्यामुळे अखेर आ. पवार हे स्वतः विधानभवन परिसरात आज सकाळपासूनच आंदोलनाला बसले होते.
आंदोलन सुरू असताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आ. पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. या वेळी एमआयडीसीसाठी सकारात्मक अधिसूचना लवकरात लवकर काढली जाईल. याकरिता एमआयडीसीबाबत उद्योग विभागाची तत्काळ बैठक बोलावण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आ. पवार यांनी हे आंदोलन मागे घेतले.
‘माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीच्या प्रश्नी उद्याच बैठक घेऊन तातडीने अधिसूचना काढण्याबाबत उद्योग विभाग सकारात्मक असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. ना. सामंत यांच्या आश्वासनाचा सन्मान राखत आजचे उपोषण तूर्तास मागे घेत आहे. गेल्या दोन अधिवेशनात केवळ आश्वासने दिली गेली. मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांना वारंवार भेटून विनंती करुनही काहीही कार्यवाही झाली नाही.. तसं या आश्वासनाचं होऊ नये. अन्यथा मतदारसंघातील हजारो युवकांसह मुंबईत आमरण उपोषण केले जाईल. उद्योगमंत्री सामंत हेही आपल्या आश्वासनानुसार अधिसूचना काढण्याचा शब्द पाळतील, ही अपेक्षा..! – आ. रोहित पवार, कर्जत – जामखेड.