Ahmednagar News : ओळखीचा गैरफायदा घेत एका युवकाने अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीला दर्शनाला जाऊ, असे सांगून फसवून येथील एका लॉजवर अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. अत्याचार करणाऱ्या युवकास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पठार भागातील एका शाळेमध्ये इयत्ता नववी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची पठार भागातील एका युवकासोबत ओळख झाली होती. तो युवक आपल्या दुचाकीवरून पीडित मुलीच्या गावाजवळून जात असताना या मुलीने शाळेपर्यंत सोड, असे त्याला सांगितले. शाळेपर्यंतच्या प्रवासात ओळख झाल्याने त्याने तिला आपला मोबाईल क्रमांक देऊन काही अडचण असल्यास सांगत जा, असे तिला सांगितले.
त्यानंतर त्याने शनिवारी सकाळी ९ वाजता या विद्यार्थिनीला तिच्या शाळेत सोडले. त्यानंतर त्याने सकाळी साडेदहा वाजता पुन्हा शाळेच्या आवारात येवून तिला बोलावून घेतले व आपण देव दर्शनाला जावू असे सांगून तिला आपल्या गाडीवर बसवले. यानंतर त्याने दर्शनाला न जाता शहरातील एका लॉजमध्ये नेवुन तिच्यावर अत्याचार केला. या विद्यार्थिनीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिला मारहाण करून धमकी दिली. त्यानंतर त्याने या विद्यार्थिनीला पुन्हा दुपारी तीन वाजेच्या सुमारास शाळेत नेऊन सोडले.
पिडीत विद्यार्थिनीने घरी गेल्यावर घडलेली हकीकत सांगितली. तिच्या पालकांनी घारगाव पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी गणेश सुखदेव भडांगे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे हे करीत आहे. पोलिसांनी आरोपीला काल रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पुढील तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.