Pune Monsoon : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात पाऊस पडेना म्हणून चिंताग्रस्त झालेला शेतकरी मागील आठ दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कडधान्य पिकांमध्ये पाणी साचल्याने मेटाकुटीला आला आहे. शेतांमध्ये पाणी साचल्याने कडधान्य पिके वाया जाण्याच्या भीतीने बळीराजा हवालदिल झाला आहे.
एकीकडे महिनाभर पाऊस लांबल्याने भोर तालुक्यातील शेतकरी अनेक दिवस पावसाच्या प्रतीक्षेत होता. तर, दुसरीकडे आठवडाभरापूर्वी पावसाने जोरदार हजेरी लावली असून, आठ दिवस विश्रांती न घेताच पाऊस बरसत आहे. त्यामुळे भातशेतीसाठी पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
मात्र, अतिवृष्टीमुळे घेवडा, भुईमूग, चवळी, उडीद, वाटाणा ही कडधान्य पिके पाण्याखाली गेल्याने कुजून जाऊन खराब होणार असल्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. भातशेतीसाठी मुबलक पाणी लागते. त्याप्रमाणे जोरदार पाऊस पडल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे.
मात्र, कडधान्य पिकांमध्ये पाणी साचल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत आहेत. एकीकडे जोरदार पाऊस झाला म्हणून पिके वाया गेल्याची भीती, तर दुसरीकडे पाऊस पडेना म्हणून शेती करता येत नसल्याने तालुक्यातील शेतकरीवर्ग द्विधा मनःस्थितीत आहे.
जोमात आलेली कडधान्ये गेली कोमात. तालुक्यात पावसाने उशिरा हजेरी लावल्याने कडधान्य पिकांची पेरणी उशिरा केली गेली. कडधान्य पिकांची उगवण उत्कृष्ट होऊन पिके जोमात आली होती. मात्र, जोरदार पावसामुळे पाणी साचल्याने जोमात आलेली कडधान्य पिके कोमात गेल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसून येत असल्याचे बाजारवाडी येथील शेतकरी रूपेश चव्हाण यांनी सांगितले.