Pune News : तळेगाव ढमढेरे परिसरात काल रात्री विजेचा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वीज ग्राहकांना अंधारात राहावे लागले. विजे अभावी गैरसोय झाल्याने वीज ग्राहकांनी संताप व्यक्त केला. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, डिंग्रजवाडी, धानोरे, विठ्ठलवाडी, टाकळी भीमा या गावांमध्ये काल रात्री वीज नसल्याने वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजता गेलेली वीज दुसऱ्या दिवशी १२ वाजता आली. या दरम्यान शेतकऱ्यांच्या आणि दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सततच्या विजेच्या लपंडावाला कंटाळून काही शेतकरी ग्राहकांनी स्वतंत्र रोहित्र घेऊन ही विजेच्या समस्या संपत नसल्याने संतापले होते.
त्यामध्ये वीज कर्मचारी नागरिकांना योग्य वेळी वीज येणार की नाही हे सांगत नसल्याने नागरिक वाट पाहत होते. कनिष्ठ अभियंता श्रीकांत ताटेकोंडा म्हणाले की, डिंग्रजवाडी फिडर वरील दरेकरवाडी या ठिकाणी तार तुटल्याने बऱ्याच काळ वीज खंडित झाली होती.
ग्राहकांच्या सोयीसाठी आम्ही व आमचे वीज कर्मचारी ऐन पावसात रात्रभर विजेचा बिघाड काढण्यासाठी काम करत होतो.. ते काम सकाळपर्यंत संपल्यावर वीज ग्राहकांना विजेची व्यवस्था करून देण्यात आली.