MSRTC News : एसटीच्या ताफ्यात १३५० नव्या बसगाड्या

Ahmednagarlive24 office
Published:
MSRTC News

MSRTC News : शहरापासून खेडोपाड्यांपर्यंत असलेल्या सर्वसाधारण प्रवाशांची आणि एसटी बस वाहतुकीची नाळ अधिक घट्ट करण्यासाठी एसटी महामंडळाने आपली कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वीच इलेक्ट्रिक बससाठी हिरवा झेंडा दाखवत पुणे ते अहमदनगर मार्गावर महामंडळाकडून बससेवा सुरू करण्यात आली.

यानंतर डिझेलवरील जास्तीचा खर्च कमी करण्यासाठी काही बसेस सीएनजीमध्ये परावर्तित करण्यात येत असताना चालू वर्षात डिसेंबरपर्यंत एसटी महामंडळाच्या नव्या १३५० बसेस रस्त्यावर धावताना दिसणार आहेत.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या १४ हजार बस आहेत. त्यापूर्वी एसटीच्या ताफ्यात १८ हजार बसगाड्या होत्या. गेल्या तीन वर्षांत नवीन बसगाड्या खरेदी करण्यात आल्या नाहीत. मात्र आयुर्मान संपुष्टात आलेल्या बसगाड्या भंगारात काढण्यात येत असल्याने ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी झाली आहे.

परिणामी बसअभावी प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महामंडळाने आपल्या ताफ्यातील बसची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चालू वर्षअखेर पर्यंत १३५० नव्या बसगाड्या एसटी महामंडळात दाखल होणार आहेत.

यापैकी सध्या ७६७ गाड्या दाखल झाल्या असून उर्वरित ५८३ गाड्या येणे बाकी आहेत. यासोबत पुढील वर्षात १०,८५० नव्या एसटी बसेस दाखल होणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe