अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात बनावट खताची विक्री

Published on -

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील एक मोठी व्यापारी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथे बनावट रासायनिक खत विक्री केली जात असल्याची तक्रार पाथर्डी तालुका कृषी विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे एका शेतकऱ्याने केली आहे.

याबाबत तिसगाव येथील शेतकरी सोमनाथ अरुण अकोलकर यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, तिसगाव येथील शेवगाव रोडवर असलेल्या एका कृषी केंद्रामधून २० २० १३ हे रासायनिक खत खरेदी केले. घरी आल्यावर सदर खत पाण्यात टाकले असता खूप वेळ झाला तरी ते विरघळे नाही. म्हणून शेतकरी अकोलकर यांनी ते खत पुन्हा कृषी केंद्र चालकाकडे आणून खत विरघळत का नाही असे विचारले.

त्यावर संबंधित कृषी केंद्र चालकाने सांगितले हे खत विरघळत नाही. त्यानंतर या शेतकऱ्याने दुसऱ्या एका कृषी केंद्रामध्ये जाऊन याच कंपनीचे खत खरेदी केले व ते घरी जाऊन पाण्यामध्ये विरघळते का याची खात्री केली तर ते काही वेळात विरघळे असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने अगोदर घेतलेल्या कृषी केंद्र चालकाला याबाबत जाब विचारला असता त्याने शेतकऱ्याला अरेरावीची भाषा केल्याने संबंधित कृषी केंद्र चालका विरोधात तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे बनावट खत विक्री केली जात असल्याची तक्रार लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

पंधरा दिवसांपूर्वीच वृद्धेश्वर चौकातील एका कृषी केंद्र चालकाने शेतकऱ्याकडून अॅडव्हान्स पैसे घेऊनही त्या शेतकऱ्याला वेळेवर खत दिले नाही म्हणून त्या कृषी केंद्र चालक विरोधातही कृषी विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. वारंवार तिसगाव येथील कृषी केंद्र चालकांविरोधात शेतकऱ्यांच्या तक्रारी पुढे येत असल्याने आता कृषी विभाग याबाबत चौकशी करून शेतकऱ्यांना विकल्या जाणाऱ्या रासायनिक खतांबाबत वस्तुस्थिती शेतकरी वर्गापुढे आणणार का हे महत्त्वाचे ठरणारे आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe