Shrigonda News : मोठा पाऊस लवकर आला नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी पावसाळ्यात फिरावे लागणार

Ahmednagarlive24 office
Published:
Shrigonda News

Shrigonda News : पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला असताना अद्याप पर्यंत दमदार पाऊस पडलेला नाही. श्रीगोंदा शहरासह तालुक्याच्या काही भागांत कुठे रिमझिम, तर कुठे अचानक जोरदार सरी अशी पावसाची स्थिती सुरू आहे. पावसाने खरिपातील पिके जोमात आली असून, येणाऱ्या काळात मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली असून भीज पावसामुळे तालुक्यातील पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही.

सध्या राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत असून अनेक भागातील नद्यांना पूर आला असून त्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे श्रीगोंदा शहरासह कोळगाव, चिखली, काष्टी, बेलवंडी, मांडवगण, लोणी व्यंकनाथ, वांगदरी, आढळगाव या परिसरासह तालुक्यातील अनेक गावात काही ठिकाणी पिण्याचे पाणी आहे. पिकांसाठी नाही, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाने पिके तरली असताना, पिण्यासाठी पाणी नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्याला पाणी पुरवठा करणाऱ्या कुकडी कालव्यावरील विसापूर धरणात साडेनऊ टक्के तसेच घोड धरणात सव्वापाच टक्के पाणी शिल्लक असल्याने मोठ्या पावसाची अपेक्षा लागून राहिली असून, मोठा पाऊस लवकर आला नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात लोकांना वणवण फिरावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मागील काही दिवसापासून तालुक्यात सुरू असलेल्या रमझिम पावसामूळे शेतकऱ्यांनी पेरलेली कापूस, सोयाबीन, तूर, बाजरी, उडीद, मूग, मका ही पिके जोमात आली आहेत. तर डाळिंब, लिंबोनी, द्राक्ष या सारख्या फळबागा तरल्या असताना तालुक्यातील शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आस लागून राहिली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा १९५ मिमी, काष्टी १०२.०३ मिमी, मांडवगण १६५ मिमी, बेलवंडी २०३ मिमी, पेडगाव १११.०४ मिमी, चिंभळे २४३.०९ मिमी, देवदैठन १५१ मिमी, कोळगाव २१५.०५ मिमी पाऊस या आठ कृषी मंडळात मिळून तालुक्यात सरासरी १७३.०४ मिमी, १०४.०८ टक्के पाऊस पडला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe