Maharashtra News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान खंडोबारायांची सासुरवाडी नेवासा बुद्रुक येथील पुरातन म्हाळसा – खंडोबा बाणाई मंदिर प्रांगणात जावई व लेकींसाठी धोंडा कार्यक्रमाला रविवारी (दि. (३०) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सन्मान चिन्ह व गौरव पत्र देऊन लेकी व जावईबापूंचा गौरव करण्यात आला.
लेकी जावईसाठी आयोजित धोंडा कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी सकाळी ७ ते ८ यावेळेत मंदिरातील म्हाळसा खंडोबा बाणाई मातेच्या मूर्तीस नेवासा बुद्रुक गावचे सरपंच प्रकाश सोनटक्के व प्रज्ञाताई सोनटके यांच्या हस्ते वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. सकाळी ९ ते १० तळी भंडार व आरती, सकाळी १० ते १२ यावेळेत कोंडीराम महाराज पेचे यांचे प्रवचन झाले.
यावेळी मंदिर व्यवस्थापक संभाजी ठाणगे व सरपंच प्रकाश सोनटक्के समर्पण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, प्रा. जानकीराम डौले, मंदिर पुजारी प्रसाद रहाट, मंदिर पुजारी प्रसाद रहाट, राजेंद्र थावरे, अनिल मारकळी, पिंटू बोरकर, नितीन पवार, अनिल हापसे यांच्या उपस्थितीत आलेल्या लेकी व जावई बापूंचा सत्कार करण्यात आला. दुपारी १ वाजता दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सोहळ्यासाठी नेवासा बुद्रुक येथील गाडगे महाराज भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या साथीनेच सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
एक दिवशीय धोंडा कार्यक्रम प्रसंगी पुरातन म्हाळसा – खंडोबा बाणाई मंदिराचे व्यवस्थापक संभाजी ठाणगे व पुजारी प्रसाद रहाट यांच्यासह जिर्णोद्धार समिती व समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.