Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील कानडगावातील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींचा सीसीटीव्ही फुटेजमुळे अडीच महिन्यांनंतर शोध लागला. गावातीलच एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेने तपास करत इतर पाच दरोडेखोरांना अटक करत कानडगावातील दरोड्याचा गुन्हा उघड केला.
कानडगाव (ता. राहुरी) येथे सहा ते सात दरोडेखोरांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व दागिने, असा ६५ हजारांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना मे महिन्यात घडली होती.
याबाबत विक्रम संजय मातोळे (रा. कानडगाव, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध लागत नव्हता. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दरोड्याचा गुन्हा उघड करण्याच्या सूचना गुन्हे शाखेला केल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शाखेने घटनास्थळी भेट देऊन साक्षीदारांशी चर्चा केली. यातन आरोपी व त्यांनी वापरलेली कार याची माहिती पोलिसांना मिळाली. यातून पोलिसांना शोएब दाऊद शेख (वय २५, रा. कानडगाव, ता. राहुरी) याला ताब्यात घेतले. त्याच्या अधिक विश्वासात घेतले असता त्याने हा गुन्हा साथीदारांच्या मदतीने केला असल्याची कबुली दिली.
त्याने दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेने गॅसउद्दीन उर्फ गॅस रजाउल्ला वारसी (वय २१) नफीस रफिक सय्यद (वय २३, दोघे राहणार सिडको, जि नाशिक), अश्पाक उर्फ मुन्ना पटेल ( वय २१), शेखर राजेंद्र शिंदे (वय २४, दोघे राहणार कोल्हार, ता. राहाता), मंगेश बबनराव पवार (वय ३२, रा. इंदिरानगर, श्रीरामपूर) अशा पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. तसेच समीर सय्यद (रा. पंचवटी, नाशिक), हासीम खान (रा. सिडको, नाशिक) यांची नावे निष्पन्न झाली असून, ते फरार आहेत.