Ahmednagar Breaking : नगर तालुक्यातील जांब येथील जिल्हा परिषद शाळेची धोकादायक भित वर्गातच कोसळल्याची घटना घडली आहे. ही भिंत रात्रीच्या वेळी कोसळल्यामुळे वर्गात विद्यार्थी नव्हते त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. नाहीतर निंबोडी शाळेत भित कोसळून तीन विद्यार्थी मयत झाले होते. त्याची पुनरावृत्ती जांब येथे झाली असती, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नगर तालुक्यातील कौडगाव ग्रुप ग्रामपंचायतमधील जांब येथे जिल्हा परिषदेची द्विशिक्षकी प्राथमिक शाळा आहे. या शाळेच्या दोन खोल्या सुमारे ६० वर्षांपूर्वी बांधलेल्या आहेत. त्या दोन्ही खोल्या धोकादायक झाल्याने त्या निर्लेखित करून तेथे नव्या दोन खोल्या मंजूर कराव्यात याबाबत तेथील स्थानिक नागरिक तसेच तत्कालीन पंचायत समिती सभापती सुरेखा गुंड यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली होती. त्याबाबतचा प्रस्तावही पाठविण्यात आलेला होता. जिल्हा परिषद प्रशासनाने त्यातील एक खोली निर्लेखित करण्यास मंजुरी दिल्ली होती, त्यामुळे ती पाडण्यातही आली होती. त्यामुळे एकाच खोलीत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे विद्यार्थी बसत होते.

रविवारी (दि.३०) रात्रीच्या सुमारास अचानक त्या एका खोलीचे छत व भित कोसळली. भिंतीचे दगड व छताचे पत्रे खोलीत पडले. सोमवारी (दि. ३१) सकाळी ही बाब निदर्शनास आली. नगर तालुक्यातील निंबोडी येथे काही वर्षांपूर्वी शाळेची भिंत अंगावर कोसळून तोन विद्यार्थी मयत झाले होते. त्या घटनेसारखीच ही घटना घडली. मात्र या ठिकाणी रात्रीच्या वेळी ही भित कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
जांब येथील शाळा रात्रीच्या वेळी पडल्याने सुदैवाने निबोडीची पुनरावृत्ती टळली आहे, अशीच धोकादायक इमारत तालुक्यातील सारोळा बद्धी शाळेचीही झालेली आहे. याशिवाय इतरही धोकादायक शाळा खोल्या असून त्या तातडीने निर्लेखित कराव्यात व तेथे नव्याने शाळा खोल्यांना मंजुरी देण्यात यावी अशी मागणी आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नगर तालुका शिवसेनेच्या वतीने करणार असून त्यावर तातडीने निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा संदेश कार्ले यांनी दिला आहे.