Maharashtra News : सर्दी, ताप, डोकेदुखी व खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. मागील पंधरा वीस दिवसांपासून शहरात पाऊस होत आहे. रिमझिम पावसाने रस्त्यावर पाणी साचत असून डासांची पैदास होत आहे. त्यामुळे खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसून येते आहे. लहान मुले, वृद्ध व गरोदर मातांची काळजी घेणे. आवश्यक असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.
त्यात सर्दी, ताप, डोकेदुखी, खोकला, उलटीचा त्रास होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. बहुतांश घरात ही लक्षणे असणारे रुग्ण आहे. जिल्ह्यातही तशीच स्थिती आहे. अनेक रुग्णांना खोकला एक ते दोन आठवड्यापर्यंत राहतो.
दीर्घकाळ सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे, शरीरात वेदना होणे, थंडी वाजून येणे, थकवा जाणवणे, अतिसार, उलट्या आणि धाप लागणे अशी लक्षणे आढळल्यास वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम, थेरगाव मोशी आदी सरकारी दवाखान्यामध्ये बहुतांश सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहेत. सततच्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण होत असून दोन वर्षांखालील बालकांवर याचा परिणाम होत आहे.
उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हवेतून पसरणाऱ्या साथीच्या आजारांमुळे रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. प्रामुख्याने ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशांना सर्दी, खोकल्याच्या आजाराचा प्रादुर्भाव जास्त होताना दिसत आहे.