Fake Fertilizer: खरीप हंगामाची सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामातील पेरण्या जवळ जवळ आटोपले आहेत. आताचा जो कालावधी आहे तो प्रामुख्याने पिकांना रासायनिक खते देण्याचा आहे. परंतु बऱ्याचदा रासायनिक खत विक्रीमध्ये बनावट असलेल्या खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जात असल्याच्या बातम्या देखील समोर आलेले आहेत. अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते.
खत खरेदी करिता आवश्यक पैसा तर वाया जातोच परंतु त्याचा कुठलाही प्रकारचा परिणाम पिकांवर न झाल्यामुळे उत्पादनात देखील घट येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकरी बंधूंनी खते व बियाणे खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे देखील तेवढेच गरजेचे आहे.
रासायनिक खतांचा विचार केला तर यामध्ये डीएपी खताचा वापर मोठ्या प्रमाणावर शेतकरी बंधू करतात. परंतु आता खतांमध्ये देखील बनावट खत ओळखणे खूप कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर या लेखामध्ये आपण काही ट्रिक्स च्या आधारे एका मिनिटांमध्ये डीएपी खत बनावट आहे की काय? हे पटकन ओळखू शकतो.
अशा पद्धतीने ओळखावे बनावट डीएपी खत
1- तुम्हाला जर बनावट डीएपी खत ओळखायचे असेल तर सगळ्यात अगोदर डीएपी खताचे काही दाणे हातावर घ्यावे.
2- हातावर घेतल्यानंतर त्यात तंबाखू मध्ये चुना टाकतो त्याप्रमाणे चुना टाकावा आणि थोडा वेळ चांगला त्याला घासून घ्यावे म्हणजेच मॅश करून घ्या.
3- हे केल्यानंतर जर डीएपी खतातून उग्र वास येत असेल किंवा त्याचा वास घेणे खूप कठीण जात असेल तर हे खत खरे समजावे.
4- तसेच डीएपी खताचे दाणे जर टणक, दाणेदार आणि तपकिरी व काळ्या रंगाचे असतील तर ते खत खरे असते. नखाने तोडण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर हे दाणे सहजासहजी तुटत नाहीत.
5- परंतु डीएपी खत जर बनावट असेल तर त्याचे दाणे नखाने सहजपणे फुटतात. असे झाले तर डीएपी खते पूर्णपणे बनावट आहे असे समजा.
खते व बियाणे खरेदी करताना या गोष्टी पाळा
तुम्ही जेव्हाही खते किंवा बियाणे व कीटकनाशके खरेदी कराल ते नेहमी परवानाधारक दुकानातूनच खरेदी करणे गरजेचे आहे. तसेच खते किंवा बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना त्याची पॅकिंग ही सीलबंद आहे की नाही हे पाहून घ्यावे. तसेच त्यांची एक्सपायरी डेट व्यवस्थित तपासून घ्यावी.
तसेच तुम्ही ज्या दुकानातून खते, बी बियाणे आणि कीटकनाशक खरेदी करणार आहात त्या दुकानातून पक्के बिल घेणे खूप गरजेचे आहे. या बिलावर संबंधित दुकानाचा परवाना क्रमांक तसेच दुकानाचे पूर्ण नाव व पत्ता, विक्रेत्याची सही आणि त्यासोबतच उत्पादनाचे नाव, त्या उत्पादनाचा लॉट व बॅच नंबर आणि तारीख हे देखील बिलामध्ये नमूद असणे गरजेचे आहे.