Maharashtra News : डोंबिवली ते ठाणे अवघ्या २० मिनिटांत पोहोचता येणार, अशी जाहिरातबाजी गेली काही वर्षे सुरू आहे. त्यामुळे मोठागाव-माणकोली पूल नागरिकांसाठी कधी खुला होणार? याची चर्चा होत आहे. ३१ मेपर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, अशी डेडलाइन देण्यात आली असताना ऑगस्ट सुरू झाला तरी पुलाचे काम पूर्ण झाले नाही. मोठागाव-माणकोली पुलाच्या कामाची पाहणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली.
मोठागाव- माणकोली खाडी पुलाचे काम पूर्णत्वास होत आले आहे. मे वा जून महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी सुरू होईल, अशी डेडलाइन देण्यात आली होती. गेल्या दोन महिन्यांत या रखडलेल्या पुलाचे काम आजही पूर्णत्वास होऊ शकले नाही. त्यामुळे या पुलावरून प्रवास करण्याची प्रतीक्षा कधी संपेल ? असा प्रश्न डोंबिवलीकरांना पडला आहे.
या पुलाचे अवघे ५ टक्के काम शिल्लक आहे, ते कधीही चुटकीसारखे करता येणार आहे. पण माणकोली आणि मोठागाव रेतीबंदर येथील जोड रस्ते आणि पर्यायी रस्त्यांचे काम रखडल्याने ‘तारीख पे तारीख’ करत पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुढे ढकलण्यात येत आहे. त्यातच मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या पुलाच्या कामाचा पहाणी दौरा केल्याने आता शिवसेना आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली आहे.
त्या वेळी ते म्हणाले की, तीन-चार महिन्यांपासून तारीख पे तारीख अशा उद्घाटनाच्या तारखा दिल्या गेल्या. मात्र, अजूनही पुलाचे काम बाकी आहे. माणकोली येथे नाशिक बायपासला जोडणारा रस्ता व मोठागाव येथील रस्ते पूर्णत्वास गेलेले नाही. यावरून कामामध्ये योग्य नियोजन नसल्याचे दिसत आहे. एकंदरीत सत्ताधाऱ्यांनी कल्याण-डोंबिवलीकरांना खडेच दिले आहेत. त्यामुळे विकास काय दाखवणार? हाच मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन करण्यासाठी काम पूर्णन झाल्याचा बहाणा करत जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याचा आरोप आ. राजू पाटील यांनी केला आहे. मोठागाव-माणकोली पुलाचे काम अंतिम टप्यात आले असून, ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
नाशिक महामार्गाला जोडण्यासाठी वेगळी व्यवस्था व आवश्यक जोड रस्ते तयार करण्याचे काम सुरू आहे. विकासात्मक कामे करताना अनेकदा अडचणी येत असतात त्यामुळे विलंब होत असतो. या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर पाहणीसाठी आमदारांना नक्की बोलावू. दिवाळीनंतर या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल. अशी माहिती युवासेनेचे दिपेश म्हात्रे यांनी दिली.
तसेच आ. राजू पाटील यांनी आधी आपल्या स्वतःच्या मतदारसंघातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पहाणी करावी. महापालिकेच्या अखत्यारीतील रस्त्यांवर खड़े भरण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. पण पेंढारकर कॉलेजसमोरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यावर खड्डे पडून त्याची चाळण झाली आहे, त्याबाबत आपले शेजारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांनादेखील सांगावे, असा टोला दिपेश म्हात्रे यांनी लगावला.