Maharashtra News : भिवंडी शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना ठाणे व मुंबईला जाण्यासाठी एसटीशिवाय शासकीय दळणवळण साधन नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते भिवंडी रोड रेल्वे स्टेशन व्हाया दिवा अशी लोकल ट्रेन तातडीने सुरू करावी, अशी मागणी भिवंडी शिवसेना (उबाठा) च्या वतीने करण्यात आली.
यासंदर्भात रेल्वे महाप्रबंधकांशी शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे. शहर परिसरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग कारखाने, ट्रान्सपोर्ट गोडाऊन, सायझिंग, डाईंग, मोती कारखाने, सोनार दुकानदार आणि विविध व्यवसायांचे व्यापारी तसेच नोकरदार, विद्यार्थ्यांचा दररोज विविध कारणामुळे मुंबई व ठाणे संबंध येत आहे.
येथे जाण्यासाठी एसटी बस व खाजगी वाहनांचा वापर व्यापारी नोकरदार वर्ग व विद्यार्थ्यांना प्रवासासाठी करावा लागत आहे. त्यामुळे सर्व व्यापारी, नोकरदार वर्ग त्रस्त झाले आहेत. त्यामुळे भिवंडीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते भिवंडी रोड रेल्वे स्टेशन व्हाया दिवा अशी तासाला सुरू केल्यास प्रवासी नागरिकांची मोठी सोय होईल.
त्यामुळे तातडीने लोकल रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अजय मिश्रा यांची मुंबई येथील कार्यालयात भेट घेऊन शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.