Ahmednagar News : समृद्धी महामार्गावरील पुलाखाली झगडे फाटा ते देर्डे फाटा शिवारात शुक्रवारी (दि.४) रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास एका महिलेला मृतदेह आढळला. याप्रकरणी अज्ञात वाहनाविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अज्ञात वाहनावरील चालकाने त्यातील वाहन रस्त्याचे परिस्थीतीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून अनोळखी महिलेस जोराची धडक देवून तिचे डोक्यास गंभीर जखम करुन इतरत्र मार लागून अपघात करून तिचे मृत्यूस कारणीभूत झाला आहे.
सदर महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्ष असून तिच्या अंगात पांढऱ्या रंगाचा हाफ टी शर्ट, काळा रंगाची पेंन्ट केस लांब उंची अंदाजे ५ फुट, चेहरा गोल, रंग निमगोरा, नाक बसके, डावे हातावर बदाम चित्र काढलेले, डावे हाताचे अंगठा व जवळचे बोटावर वरचे बाजूस ट गोंदलेले, डावे हातावर पंजाचे खाली हातावर इंग्रजीत एम असे गोंदलेले आहे.
महिलेची ओळख अद्याप पटली नसुन घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. याप्रकरणी अज्ञात वाहनाविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे करीत आहे.