Kanda Anudan : शेतकरी विचारत आहेत एकच प्रश्न कांदा अनुदान कधी मिळणार ?

Ahmednagarlive24 office
Published:
Kanda Anudan

Kanda Anudan : गेल्या वर्षी खरीप हंगामात सतत पावसाने तसेच रब्बी हंगामात मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईची मदत शासनाने अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कांदा अनुदान कधी मिळणार असा सवाल? शेतकरी करीत आहेत. नेवासा तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा झाल्या आहेत.

गेल्या वर्षी नेवासा तालुक्यात खरीप हंगामात सततच्या पावसाने खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. आठ मंडळांपैकी तीन मंडळात अतिवृष्टी तर पाच मंडळात सतत पाऊस झाल्याने सोयाबीन, बाजरी, कपाशी, मूग आदी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीला आला होता. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केल्याने महसूल व कृषी विभागाने नुकसान झालेल्या क्षेत्रांचे पंचनामे केले होते.

रब्बी हंगामातही तालुक्यात अवकाळी पावसाने गहू, कांदा, हरभरा, ज्वारी आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचेही महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. मात्र नुकसानीची भरपाई मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला होता. भरपाईसाठी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांना आंदोलने करावी लागली. प्रशासनाला वारंवार निवेदने द्यावी लागली.

शेतकऱ्यांच्या उद्रेकानंतर तालुक्यातील तीन महसूल मंडळाला अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्यात आली. मात्र पाच मंडळांना सतत पावसाची भरपाई मिळत नव्हती. अखेर दहा महिन्यांनंतर का होईना शासनाला जाग आली. सोमवारपासून गत दोन्ही हंगामातील नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली. शासनाने नुकसान भरपाईचे अनुदान खात्यावर वर्ग केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून चालू खरीप हंगामातील पिकांसाठी ही मदत मोलाची ठरणार आहे.

खरीप आणि रब्बीची नुकसान भरपाई जमा होत आहे. मात्र शासनाने घोषित केलेले कांद्याचे तीनशे पन्नास रुपये अनुदान अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. ते अनुदानही लवकरात लवकर शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ तुवर यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe