Agricultural News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना ३२ कोटींची नुकसान भरपाई !

Published on -

Agricultural News : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील ४४ हजार ७२४ शेतकऱ्यांना ३१ कोटी ९५ लाख रुपयांची नुकसान भरपाई राज्य शासनाने मंजूर केली आहे.

मागील वर्षी कर्जत-जामखेड मतदारसंघात अवकाळी पावसासह अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

कर्जत तालुक्यातील ९८ गावांमधील २९ हजार १२८० शेतकऱ्यांना २३ कोटी २५ लाख तर जामखेड तालुक्यातील ५३ गावातील १५ हजार ४४४ शेतकऱ्यांना ८ कोटी ७० लाख तर असे एकूण ३१ कोटी ९५ लाखांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. मंजूर अनुदानाचे वाटप सुरू झाल्याने कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मागील वर्षी कर्जत जामखेड मतदारसंघात अवकाळी पावसासह अतिवृष्टीने हाहाकार उडाला होता. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत बळीराजा आर्थिक संकटात सापडला होता. पंचनामे होऊन वर्ष लोटत आले होते. त्यातच यंदा पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली होती.

कर्जत तालुक्यात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कर्जत तालुका प्रशासनाने ३५ हजार ८४५ शेतकन्यांसाठी २७ कोटी २२ लाख ५४ हजार ५७९ इतक्या अनुदानाची मागणी केली होती.

त्यापैकी २३ कोटी २५ लाख ६८ हजार ६७१ रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. ९८ गावांमधील २९ हजार २८० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हे अनुदान झाले आहे. तर उर्वरित ३ कोटी ९६ लाख ८५ हजार ९०६ रुपयांचे अनुदान लवकरच प्राप्त होणार आहे.

यासह जामखेड तालुक्यात सप्टेंबर- ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे २३ हजार ६५६ शेतकऱ्यांची पिके बाधित झाल्याचे पंचनाम्यानंतर समोर आले होते. त्यानुसार तालुका प्रशासनाने १३ हजार ९९५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान भरपाईपोटी २२ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे ३ नोव्हेंबर २०२२ रोजी केली होती.

परंतु, २७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार १९ हजार ५६० शेतकऱ्यांना ११ कोटी ७० लाख रुपयांचे अनुदान जामखेड तालुक्यासाठी शासनाने मंजूर केले आहे. यातील ८ कोटी ७० लाख रुपये जमा झाले आहे.

जामखेड तालुक्यातील ३४ गावांमधील ४ हजार शेतकऱ्यांचे २ कोटी ३० लाख रुपयांचे अनुदान येणे बाकी आहे. तेही अनुदान लवकरच प्राप्त होणार आहे. ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला.

यंदा कर्जत-जामखेड मतदारसंघात पावसाचे प्रमाण कमी आहे. दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवली आहे. शेतकरी बांधव संकटात सापडला आहे. मागील वर्षीच्या नुकसान भरपाईसाठी आमदार प्रा. राम शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. सरकारने मागील वर्षीचे नुकसान भरपाई अनुदान देण्याचा निर्णय घेतला.- काकासाहेब तापकीर, सभापती, बाजार समिती, कर्जत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe