Zilla Parishad Recruitment : राज्य सरकारने २०१९ साली जिल्हा परिषद आरोग्य विभागातील एकूण १८ संवर्गातील १३ हजार ५१४ जागांची भरतीची घोषणा केली होती. संपूर्ण राज्यभरातून ११ लाख २८ हजार १३३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केले होते. तर ‘न्यासा’ या कंपनीबरोबर परीक्षा घेण्याबाबत करार केला होता.
त्यापोटी तब्बल २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक शुल्क मिळाले आहे. मात्र पाच वर्षे होत आली, तरी अद्याप या परीक्षा झालेल्या नाहीत. कधी होणार? याबाबत कोणीही काही सांगत नाही. आता राज्य शासनाने पुन्हा १९ हजार ४६० पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी तब्बल एक हजार रुपयांचे प्रवेश शुल्क ठेवले आहे. मात्र आधीच्या १३ हजार ५१४ जागांचे आणि २५ कोटींचे काय झाले त्या परीक्षा कधी होणार आहेत, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.
जिल्हा परिषदेच्या १३ हजार ५२१ या विविध पदांची रखडलेली भरती तत्काळ सुरू करावी. या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी मागील वर्षी ट्विटर वॉर केले होते. तसेच राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. परंतु केवळ आश्वासने मिळाली. परीक्षा अद्याप झालेली नाही. राज्यातील लाखो विद्यार्थी या परीक्षेची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.
मात्र पाच वर्षांनंतर या परीक्षेबाबत काहीच हालचाली होत परीक्षेबाबत काहीच हालचाली होत नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये त्यामुळे प्रचंड नैराश्येचे वातावरण आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग किती काळ खेळणार आहे, असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत.
राज्य शासनाने घोषणा करून पाच वर्षांचा कालावधी लोटला आहे. तरी परीक्षा घेत नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्कापोटी भरलेली २५ कोटी रुपयांची रक्कम कुठे गेली ? आता नवीण विद्यार्थ्यांना फॉर्म भरायला संधी देणार आहे, असे सरकार सांगत आहे.
पुन्हा त्यासाठी शुल्क घेणार असून, आता परीक्षा शुल्क १०० रुपये ठेवले आहे. हा सर्व प्रकार म्हणजे, सरकार सर्वसामान्य विद्यार्थ्यांची लूट करत आहे.- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा – समन्वय समिती