Lumpy Skin Disease : लम्पी स्कीनच्या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. ऐतवडे बुद्रुक आणि परिसरातील कार्वे गावात ३ जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. त्यामुळे या परिसरातील पशुधन धोक्यात येत असून पुन्हा एकदा बळीराजा समोर चिंतेचे ढग पसरत आहेत.
वास्तविक लम्पी स्कीन आजार आटोक्यात आला, असे वाटत असतानाच या आजाराने आता पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. संसर्गजन्य असलेल्या या आजाराची लागण सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक अन् कार्वे येथील जनावरांना झाली आहे.
शिवाय त्यामुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. मागील वर्षी संपूर्ण राज्यभरात जनावरांवर लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाला होता.. मोठया प्रमाणावर जनावरे देखील दगावली होती.
लम्पी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात मोठया प्रमाणावर जनावरांचे लसीकरण करण्यात आले होते. लम्पीचा धोका वाढत असल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. या आजाराचा धोका टाळण्यासाठी पशुधन विभागाने लसीकरणावर भर देणं गरजेचं आहे.
सध्या शेतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांचे अर्थकारण जनावरांवर अवलंबून आहे. पुन्हा एकदा लम्पी आजाराचा शिरकाव झाला असून, जनावरे दगावण्याची भीती शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
बाधित आढळून आलेल्या जनावरांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. त्या जनावरांना विलगीकरण केलं पाहिजे, जेणेकरुन ते इतर जनावरांच्या संपर्कात येणार नाहीत. या जनावरांना चारा आणि पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजे.
लम्मीची जनावरांना लागण झाल्यावर तात्काळ परिसरातील पशुसंवर्धन विभागाला याबाबत माहिती दिली पाहिजे. सोबतच बाधित जनावरांवर पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार करणे आवश्यक आहे.
लम्पी चर्म रोग हा पशुधानातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो त्वरित उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता त्वरित पशुवैद्यकीय डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार करणे गरजेचे आहे, यामुळे जनावरे दगावण्याचा धोका कमी आहे.