गृहमंत्र्यांनी नगर शहराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे : माजी महापौर कळमकर यांची मागणी

Published on -

Ahmednagar News : ऐतिहासिक नगर शहरात पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य असलेली क्लिप व्हायरल झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीस अटक केली आहे. मात्र या घटनेने शहरात वाढत असलेल्या असामाजिक प्रवृत्तींचा प्रश्न निर्माण झाला आहे.

यापूर्वीही असे प्रकार शहरात घडले असून यातून सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. हे थांबण्याची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर शहरात विशेष लक्ष घालून अशा अपप्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

तसेच अशा घटना शहरात वारंवार का घडतात याची सखोल चौकशी करून यामागचा मास्टरमाईंड शोधावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष व माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात कळमकर यांनी म्हटले आहे की, नगर शहरातील मुकुंदनगर भागातील एका तरूणाने आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप तयार करून ती व्हायरल केली.

त्याला पोलिसांनी अटक केली असली तरी या घटनेने शिवप्रेमींमध्ये तीव्र रोष व संताप व्यक्त होत आहे. मुळात अशाप्रकारे आराध्य दैवताबाबत आक्षेपार्ह बोलण्याची हिंमतच कशी होते हा प्रश्न आहे.

पोलिस कायद्याने कारवाई करतात परंतु, घाणेरड्या प्रवृत्तींना कायद्याचाही धाक राहिलेला नाही अशीच परिस्थिती आहे. गृहमंत्री फडणवीस सातत्याने सांगतात की महापुरुषांबद्दल चुकीचे बोलणाऱ्यांची गय केली जाणार नाही. प्रत्यक्षात अशा बेताल वक्तव्यांची मालिका सुरूच असल्याचे कळमकर यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe