Inflation In India : सर्वसामान्यांचे जगणे होणार महाग, आणखी वाढणार महागाई !

Ahmednagarlive24 office
Published:

Inflation In India : गेल्या महिनाभरात टोमॅटोपाठोपाठ कांदा, बटाटा, तांदूळ यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याचे चटके सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. पण त्याचवेळी खाद्यान्नाच्या भडकलेल्या किमती किरकोळ महागाई भडकण्यासाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे जुलै महिन्यामध्ये किरकोळ महागाईचा दर मागील महिन्याच्या तुलनेत १.९० टक्क्यांनी वाढून ६.७ टक्क्यांवर जाऊ शकतो, अशी भीती डॉइश बँक इंडियाच्या अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बँकेच्या अहवालानुसार, ग्राहक किंमत-आधारित महागाई निर्देशांक १९० बेसिस पॉइंटनी ६.७ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो जूनमध्ये हा महागाई दर ४.८ टक्के होता. जुलै महिन्यातील महागाईची आकडेवारी आणि रिझर्व्ह बँकेचे पतधोरण लवकरच जाहीर होणार आहे.

त्यापूर्वी डॉइश बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ कौशिक दास यांच्या अध्यक्षतेखालील अर्थतज्ज्ञांचा हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालामध्ये किरकोळ महागाई वाढण्याची भीती व्यक्तकरण्यात आली आहे.

अहवालानुसार, महागाई वाढण्यामागील मुख्य कारण म्हणजे टोमॅटो आणि कांद्याबरोबरच इतर खाद्यपदार्थांच्या किमतीत झालेली वाढ. टोमॅटो- कांद्याबरोबरच तांदळाचे भावही वाढले आहेत.

तब्बल २२ जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या दैनंदिन किमतीत १२.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी जूनमध्ये सरासरी २.४ टक्क्यांनी वाढ झाली. टोमॅटोचे भाव जुलैमध्ये २३६.१ टक्क्यांनी वाढले होते,

तर जूनमध्ये ३८ टक्क्यांनी वाढ झाली होती. दुसरीकडे कांद्याचे भाव जूनमधील ४.२ टक्क्यांवरून वाढून १५.८ टक्क्यांवर गेले आहेत. जूनमध्ये ५.७ टक्के असलेली बटाट्याची किंमत वाढ जुलैमध्ये ९.३ टक्क्यांवर गेली आहे.

टोमॅटोच्या किमतीत नुकत्याच झालेल्या वाढीचा या बैठकीच्या निकालावर परिणाम होणार नाही, असे बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीजच्या अहवालात म्हटले आहे. रिझर्व्ह बँक १० ऑगस्ट रोजी व्याजदर अपरिवर्तित ठेवेल, असे अहवालात म्हटले आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक मंगळवारी सुरू झाली. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या द्विमासिक आर्थिक आढावा बैठकीचे निकाल गुरुवारी म्हणजेच १० ऑगस्ट रोजी जाहीर केले जातील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe