Ahmednagar News : अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवणाऱ्या पोलिस पथकाच्या अंगावर वाळू माफियांनी गाडी घालून पळून जाण्याच्या प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असून, दोघा जणांना अटक केली आहे.
तसेच वाळू वाहतूक करणारे दोन डम्पर व दोन ट्रॅक्टर आणि ५५ ब्रास वाळू साठा, असा सुमारे ६८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि.७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील सामनगाव शिवारात सारपे वस्ती येथे करण्यात आली.

याप्रकरणी लाला तमीज पठाण, ऋषिकेश अर्जुन आहेर दोघे रा. भातकुडगाव, यांना अटक करण्यात आली असून, सचिन विठ्ठल तोंगे रा. भातकुडगाव, नागेश बडधे रा. जोहरापूर व गोकुळ आठरे हे तीन आरोपी पसार आहेत.
यातील आरोपी हे तालुक्यातील सामनगाव शिवारात सारपे वस्ती येथे अवैधरीत्या वाळू उपसा करत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली, पोलीस तेथे कारवाई करण्यासाठी गेले असता, आरोपी लाला शेख याने स्कार्पिओ गाडी पोलिसांच्या अंगावर घालण्याच्या प्रयत्न करून पळून जाण्याच्या तयारीत होता.
मात्र, पोलिसांनी त्याला रोखले. तर इतर आरोपी जेसीबी व ट्रॅक्टर घेऊन पळून गेले. पोकॉ. गणेश गलधर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणणे, वाळू चोरी पर्यावरण संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.