Surat Chennai Expressway : सुरत -चेन्नई महामार्गात वडिलोपार्जित जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गापेक्षा दुपटीने मोबदला मिळाला नाही तर आंदोलनाची भूमिका स्वीकारणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे यांनी दिला आहे.
सुरत – चेन्नई राष्ट्रीय महामार्ग चिचोंडी पाटील गावातील एकुण ९५ गटामधून जात असून त्यापैकी ७ शासकीय गटांमधून जाणार आहे, तर उरलेले ८८ गट हे खाजगी शेतकऱ्यांच्या मालकीचे आहेत.
या खाजगी जमिनींपैकी चिचोंडी पाटीलमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी जाणार आहेत. त्यांच्या भावना या जमिनीशी निगडित आहेत. त्या शेतकऱ्यांसाठी ही जमीन म्हणजे आई असल्याची भावना आहे.
त्यामुळे मुळातच असे काही प्रकल्प होऊ नयेत, की ज्यामुळे आपल्या वाडवडिलांचे पाय ज्या जमिनींना लागले त्या जमिनी आपल्या हातून दुसऱ्यांना जाव्यात. परंतु अशी दुर्दैवी स्थिती आल्यास शासनाकडून या जमिनींना आणी जमिनीमध्ये असलेल्या झाडे, बोअर, विहीर, घरे, जनावरांचे गोठे इत्यादींच्या किमतीपेक्षा अनेक पट रक्कम शासनाकडुन मिळालीच पाहिजे.
सुरत चेन्नई राष्ट्रीय महामार्गामध्ये – चिचोंडी पाटील गावातील व इतर गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत तसेच अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे दोन तुकडे होणार आहे.
त्यामुळे उरलेली जमीन कसण्यासाठी फार अडचणी येणार आहेत. म्हणुन शासनाने सुरत – चेन्नई रस्त्यामध्ये ज्या लोकांच्या वडिलोपार्जित जमिनी जाणार आहे अशा शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गापेक्षा दुपटीने मोबदला द्यावा जर असे घडले नाही तर मी शासनाच्या धोरणाविरुद्ध आंदोलनाची भूमिका स्वीकारेन असे अशोक कोकाटे यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच ज्यांनी सुरत -चेन्नई राष्ट्रीय महामार्गावर नव्याने जमिनी खरेदी करून शासनाचे पैसे लुटण्याचा डाव मांडला आहे. त्यांच्यावर कारवाई होण्याच्या भूमिकेवर मी ठाम असल्याचा विचारही कोकाटे यांनी व्यक्त केला आहे.