Ahmednagar Crime : स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून काढलेली दीड लाखांची रक्कम पळवली

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar Crime : माजी सैनिकाने शहरातील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून काढलेली दीड लाखांची रक्कम असलेली पिशवी दोन अनोळखी इसमांनी त्यांचे लक्ष विचलीत करत हातचलाखीने पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि.८) दुपारी दोनच्या सुमारास स्टेट बँकेच्या गेट जवळ घडली.

याबाबत सुभाष पोपट गरड ( वय ४१, रा. निंबोडी, ता. नगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी गरड हे भारतीय सैन्य दलातून निवृत्त झालेले आहेत.

त्यांनी मंगळवारी (दि.८) नगरमध्ये येवून स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतून कामानिमित्त दीड लाखाची रोकड काढली व ती त्यांच्या जवळील पिशवीत ठेवली. बँकेतून बाहेर पडून ते गेट जवळ आले असता त्यांच्याजवळ दोन अनोळखी इसम आले. त्यांनी गरड यांना बोलण्यात गुंतवले.

तसेच त्यांचे लक्ष विचलीत करुन त्यातील एकाने हातचलाखी करत त्यांच्या जवळील रोकड असलेली पिशवी काढून घेत तेथून पोबारा केला. थोड्या वेळाने रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर गरड यांनी आरडाओरडा केला

मात्र तोपर्यंत हे दोन भामटे पसार झाले होते. त्यानंतर त्यांनी भिंगार कँप पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe