Ahmednagar News : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून मंदिरातील चार दान पेट्या उचलून नेत त्यातील लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार दुसऱ्या दिवशी बुधवारी पहाटे मंदिराचे पुजारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला.
याबाबतची समजलेली माहिती अशी की, श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे मंगळवारी रात्री नऊची आरती आटोपल्यानंतर देवस्थान समितीने मंदिर बंद केले. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पाठीमागून चार-पाच अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून मंदिरातील चार दान पेट्या उचलून पाठीमागील बाजूस नेल्या.
मात्र, मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील दानपेटी मात्र चोरट्यांना उचलता न आल्याने चोरट्यांनी सपशेल माघार घेत तिथून काढता पाय घेतला. मंदिराच्या पाठीमागे नदीच्या जवळ नेलेल्या चार दान पेट्यांतील लाखो रुपयांसह सोने- चांदीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.
मात्र, दानपेटीतील चिल्लर तशीच ठेवल्याचे दिसून आले. मंदिरात चोरी झाल्याची माहिती समजताच पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक सौरभ राजगुरू, कौशल्य निरंजन वाघ तसेच श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञ देखील घटनास्थळी दाखल झाले
या वेळी पथकातील रक्षा, या श्वानाने मंदिरातील पाठीमागील नदीजवळ टाकलेल्या दानपेट्यांपासून तपासाला सुरुवात केली, पुढे वृद्धेश्वर मंदिराजवळ असलेल्या राममंदिरापासून पुढे सावरगाव घाट, या डांबरी रस्त्यापर्यंत श्वानाने चोरटे गेल्याची दिशा दाखवली.
तिथून पुढे मात्र चोरटे वाहनाने फरार झाले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे. या चोरीचा तत्काळ तपास करून चोरटयांना अटक कारवाई करावी, अशा सूचना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी पोलीस प्रशासनाला केल्या आहेत.
या चोरीच्या घटनेचा भाविक भक्तांसह घाटशिरस ग्रामस्थ व देवस्थान समितीकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी देवस्थान कर्मचाऱ्याने पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
शंभर वर्षात कधी वृद्धेश्वर येथे व परिसरात चोरीची घटना घडली नाही; परंतु गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या मंदिरांत चोऱ्या होण्याचे प्रकार वाढले आहेत. वृद्धेश्वर येथे झालेला चोरीचा प्रकार संतापजनक असून, आरोपींना पोलिसांनी पकडून कठोर कारवाई करावी – गणेश पालवे, अध्यक्ष, वृध्देश्वर देवस्थान.