Petrol Pump : पेट्रोल पंपावरील सेवा बेपत्ता झाल्या असून, ग्राहकांची त्यामुळे गैरसोय होत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही सध्या मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप सुरू करण्यात आले आहेत. मात्र, नव्या आणि जुन्या अशा सर्वच पेट्रोल पंपांवर निर्धारित सुविधांचा अभाव पाहायला मिळत आहे.
पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, अग्नीरोधक यंत्रणा, तक्रार निवारण पुस्तिका, प्रथमोपचार पेटी आणि हवेची सुविधा यांची वानवा पेट्रोल पंपावर दिसत आहे. याकडे प्रशासन, पंपचालक, मालक आणि कंपनीचे विक्री अधिकारऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने ग्राहकांची दुरवस्था होत आहे. ग्राहकांना आर्थिक भुर्दंड दंड सहन करावा लागत आहे.
पंपावरील स्वच्छतागृहे, तसेच अन्य काही सुविधांना शासन पेट्रोल पंप चालकांना अनुदान देत असते. त्यामुळे ग्राहकांसाठी सुविधा निर्माण करणे बंधनकारक असतानाही याकडे पेट्रोल पंप चालक दुर्लक्ष करत आहेत.
काही ठिकाणी पंपावरील कर्मचाऱ्यांनाच या सुविधांची माहिती नसते, तर काही ठिकाणी केवळ शासनाची सक्ती आहे म्हणून स्वच्छतागृह बांधून ठेवले आहेत. त्याचा वापर केला जात नाही. काही ठिकाणी केवळ कर्मचारीच त्यांचा वापर करीत आहेत.
ग्राहकांना त्यांची माहिती देणारे फलक लावलेले नाहीत. महामार्गावरील काही पंपावर सुविधा आहेत. मात्र, त्या दिल्या जात नाहीत, तर शहरातील पंपावर सुविधा आहेत. मात्र, अडचणीच्या ठिकाणी आहेत. त्या शोधूनही सापडत नाहीत अशा ठिकाणी असतात.
त्यामुळे ग्राहकांचे फार हाल होत आहेत. स्वच्छता कोणी करायची म्हणून स्वच्छतागृहांना कुलूप ठोकलेले असते. पेट्रोल पंपावर स्वच्छता, ग्राहकांसाठी पिण्याचे पाणी असणे बंधनकारक आहे. मात्र, बहुतांशी ठिकाणी पिण्याचे पाणी ठेवलेले नाही. असेलच तर ते कर्मचाऱ्यांसाठी ठेवलेले असते. अशा सुविधा नेमक्या कोणासाठी असतात ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तक्रार करणाऱ्याला तक्रार बुकही ठेवलेले नसते. मागणी केल्यानंतर वादावादी होते. हवा भरण्यासाठी तर कोणत्याच पंपावर सुविधा नाहीत. ग्राहकांची गर्दी होणारे ठिकाणी हवा आणि पंक्चर काढण्याची सोय असते, तीही कोणाला तरी चालवायला दिलेली असते. हवा मोफत भरण्यासाठी पैशाची आकारणी केली जाते.