Grampanchayat Election : पाथर्डी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून मतदार याद्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे ग्रामपंचायतमधून मतदार याद्या घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या देखील दोन दिवसांपासून वाढली असून, निवडणुकीसाठी कार्यकर्ते देखील अलर्ट झाले आहेत.
करंजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पुरवणी यादीसह ४ हजार १७० मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावू शकतात. या पंचवार्षिकला नव्याने जवळपास ४०० नवीन मतदार मतदान करण्यास पात्र झाले असून, त्यांची देखील या निवडणुकीमध्ये महत्त्वाची भूमिका राहणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक जवळ आल्याने सत्ताधारी गटाकडून मंजूर झालेली विकास कामे उरकून घेण्याचा सपाटा सुरू आहे. तर पुन्हा सत्ता येते की नाही यामुळे केलेल्या कामांचे बिल देखील काढून घेण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
मागील निवडणुकीत ज्यांनी ग्रामपंचायतमध्ये सत्ता बदल घडवून आणला त्यातील अनेक दिग्गजांना नंतरच्या काळात मात्र आपल्या सोयीनुसार पद्धतशीरपणे बाजूला करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या मनातील चीड देखील या निवडणुकीत दिसून येणार असल्याची चर्चा सुरू आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीआधीच सत्ताधारी गटाचे काही प्रमुख विरोधी गटाच्या गळाला लागल्याची देखील चर्चा आहे. करंजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण मतदार ४१७० इतके असुन वार्ड क्रमांक एकमध्ये ९५७, वार्ड क्रमांक दोनमध्ये ७७६, वार्ड क्रमांक तीन ८२९, वार्ड क्रमांक चार ७४७, आणि वार्ड क्रमांक पाचमध्ये ८६१ मतदार आहेत.