Ahmednagar News : जिल्ह्यात खरीप हंगामातील पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये यंदा शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये विशेषतः कर्जत-जामखेड, या तालुक्यांनी जिल्ह्यात बाजी मारली आहे.
पाथर्डी नंतर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक पीकविमा अर्ज भरले आहेत. यंदा नगर जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ७४७ शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत, त्यापैकी कर्जत तालुक्यातून १ लाख १६ हजार २५७ तर जामखेड तालुक्यातून ९४ हजार ५२७ शेतकऱ्यांच्या पिकाला विमा कवच मिळाले आहे.
दोन्ही तालुक्यांत एकूण २ लाख १० हजार ७८९ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात गावागावांत जाऊन शेतकऱ्यांचे मोफत पीक विमा अर्ज भरुन घेतले.
शेतकऱ्यांना कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागू नये, यासाठी आ. पवार यांनी स्वतः आपली टीम व कार्यकर्त्यांना पाठवून शेतकऱ्यांच्या पीकांचा विमा भरुन घेतला तसेच सातत्याने प्रबोधन व अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे.
काही ठिकाणी वीज नसल्याने पीकविमा भरण्यास अडचण येत असे, त्यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे आ. पवार यांनी अधिवेशन काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना विनंती करुन पीकविमा भरण्याची मुदत वाढवून घेतली.
जिल्ह्यात ६ लाख ७७ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना संरक्षण मिळाले आहे. कर्जत तालुक्यातील एकूण ६० हजार ०७९ हेक्टर तर जामखेड तालुक्यातील ५०, १२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना संरक्षण मिळाले आहे
सरकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रबोधन करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती नेणे फार महत्त्वाचे असते. माझी टीम, कार्यकर्ते व अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही कर्जत-जामखेडमध्ये हा उपक्रम राबवू शकलो.
त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल. यंदा पाऊस कमी असल्याने दुष्काळ पडण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत पिक विमा उतरवल्यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. आ. रोहित पवार.