Ahmednagar News : येथील कुकडी पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याने जलाशयातून पाणी उपसा परवानगी देण्याकरिता दोन हजार रुपयांची लाच मागत तडजोडीनंतर दीड हजार रुपयांची लाच स्वीकारल्याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आरोपी सुभाष यादवराव वाबळे (वय ५६, दप्तर कारकून, कार्यकारी अभियंता, कुकडी पाटबंधारे विभाग, क्रमांक २, श्रीगोंदा) यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी बोरी येथील त्यांच्या एक हेक्टर क्षेत्रासाठी जवळच असलेल्या धनगरवाडी जलाशयातून पाणी उपसा करण्याची परवानगी मिळण्याबाबतचा अर्ज कार्यकारी अभियंता कुकडी पाटबंधारे विभाग क्र. २, श्रीगोंदा यांच्याकडे केला होता.
मात्र ही परवानगी देण्याच्या मोबदल्यात कुकडी पाटबंधारे विभाग, क्रमांक २ येथे अव्वल कारकून असलेल्या सुभाष यादवराव वाबळे यांनी दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी अधिक पडताळणी केली असता लोकसेवक वाबळे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे तडजोडीअंती दीड हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती लाच रक्कम स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.